तांड्यातून थेट चीनच्या मैदानात; धाराशिवच्या सुयशची विश्वभरारी!
जागतिक कनिष्ठ सॉफ्ट टेनिस अजिंक्यपद स्पर्धेसाठी सुयश आडेची निवड; जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या वतीने गौरव
धाराशिव, दि.२८ सप्टेंबर : शिवाजी नाईक
तांड्या-वाड्यांच्या मातीत दडलेली क्रीडा गुणवत्ता आता थेट आंतरराष्ट्रीय मैदानावर झेप घेत आहे. धाराशिव शहरातील शिंगोली तांडा येथील होतकरू खेळाडू सुयश संजय आडे याची चीनमधील जिंगशान येथे ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या ५व्या जागतिक कनिष्ठ सॉफ्ट टेनिस अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सुयशच्या या आंतरराष्ट्रीय भरारीमुळे धाराशिवच्या क्रीडाविश्वात नव्या आशेची पालवी फुटली आहे.
सुयश आडे हा रुईभर येथील जयप्रकाश विद्यालयात इयत्ता बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहे. शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रात सातत्याने सराव करीत त्याने मिळविलेल्या या उल्लेखनीय यशाने ग्रामीण आणि वंचित भागातील खेळाडूंसाठी प्रेरणेचा नवा अध्याय लिहिला आहे.
चीन येथे होणाऱ्या जागतिक स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी सुयशचा गौरव केला. यावेळी त्यांनी सुयशला पेढा भरवून आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. सुयशच्या यशाचे कौतुक करताना, धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागातही गुणवत्तेची कमतरता नसून योग्य संधी, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाल्यास येथील युवक जागतिक पातळीवर आपली क्षमता सिद्ध करू शकतात, हे या यशातून अधोरेखित झाले.
तांड्यातील युवकाची आंतरराष्ट्रीय झेप
शिंगोली तांड्यासारख्या ग्रामीण परिसरातून आलेल्या सुयशने आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेपर्यंत मजल मारल्याने तांड्या-वाड्यांतील तसेच ग्रामीण भागातील युवा खेळाडूंच्या आशा उंचावल्या आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मेहनतीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय व्यासपीठ गाठता येते, याचा आदर्श सुयशने निर्माण केला आहे.
यावेळी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे समर्थक सचिन राठोड, संतोष पटाडे, कालीदास आदी उपस्थित होते.