आपलं घर शाळेची बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी : मुर्टा रस्त्यावरील अपघात; जखमींवर नळदुर्ग उपजिल्हा रुग्णालयात उपचार

नळदुर्ग, दि. २८ : 

मुंबई–हैदराबाद महामार्गावरून मुर्टा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सोमवारी (२८) सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास ‘आपलं घर’ शाळेची विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी झाली. या अपघातात बसमधील आठ विद्यार्थी-विद्यार्थिनी जखमी झाले असून, त्यांना तातडीने नळदुर्ग येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, ‘आपलं घर’ शाळेची बस ( एम.एच.२५ ए.जे २६३६)  विद्यार्थ्यांना घेऊन मुर्टा गावाच्या दिशेने जात होती. मुर्टा रस्त्यावरील एका कॉर्नरजवळ चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस पलटी झाली. अपघाताची माहिती मिळताच सुर्यकांत गायकवाड यांनी जगतगुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्य महाराज संस्थांन रुग्णवाहिका चालक सुनील भोळे  यांना कळविले. त्यानंतर जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी नळदुर्ग उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जखमी विद्यार्थी :
पूजा साळुंके (१४), साक्षी आतकरे (१५), दुर्वा शक्ती पवार (१०), पृथ्वीराज राजकुमार चव्हाण (१०), श्रावणी वामन चव्हाण (१४), अर्पिता वामन चव्हाण (१६), आलिशा अश्फाक शेख (१५) आणि राजेश भैय्यासाहेब भालेराव (१४), अशी जखमी विद्यार्थ्यांची नावे आहेत.

अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी भेट दिली. महामार्ग पोलिस केंद्राचे पोलिस हवालदार बालाजी बेंबडे,
पंडित शिंदे गणेश अर्धलिंग, सुर्यकांत गायकवाड, विक्रम पतंगे, राहुल टेलप, उदय पवार आदीसह नळदुर्ग व मुर्टा गाव व परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. अपघाताच्या घटनेमुळे पालकांमध्ये काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले.
 
Top