डॉल्बीचा कर्णकर्कश दणका; तलवारीसह गणपती विसर्जन मिरवणूक
जळकोटमध्ये ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन; धोकादायक आरास, तलवार बाळगल्याप्रकरणी दोघांवर गुन्हे
नळदुर्ग, दि.२५ सप्टेंबर :
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे गणपती विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीचा कर्णकर्कश आवाज करीत ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन, तसेच वाहनावर धोकादायक पद्धतीने आरास उभारून सार्वजनिक रहदारी व विजेच्या तारांना धोका निर्माण केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध नळदुर्ग पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. याच कारवाईत एका व्यक्तीकडे विनापरवाना धारदार तलवार आढळून आल्याने शस्त्र कायद्यान्वयेही स्वतंत्र कारवाई करण्यात आली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निसर्ग बाळासाहेब बोबडे व अमोल नागनाथ पारवे (दोघेही रा. बसवंतवाडी, तुळजापूर) यांनी २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते रात्री १० वाजण्याच्या सुमारास जळकोट येथे गणपती विसर्जन मिरवणूक काढली. या वेळी वाद्ये पारंपरिक पद्धतीने अथवा पोलिसांनी दिलेल्या सूचनांनुसार न वाजवता डॉल्बी साउंड सिस्टीमचा आवाज निर्धारित ध्वनी तीव्रतेपेक्षा अधिक व कर्णकर्कश ठेवल्याचा आरोप आहे.
मिरवणुकीतील वाहनावर उंची व रुंदीच्या मर्यादांचा विचार न करता आरास उभारण्यात आली होती. त्यामुळे सार्वजनिक रहदारीस तसेच विजेच्या तारांना धोका निर्माण होण्याची शक्यता होती. गणेशमूर्तीचेही नुकसान होऊ शकते, अशा पद्धतीने मिरवणूक काढल्याचे पोलिसांच्या कारवाईत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, संबंधित टेम्पोमध्ये निसर्ग बोबडे याच्या ताब्यात विनापरवाना धारदार तलवार आढळून आली. या प्रकरणी नळदुर्ग पोलिसांनी संबंधितांविरुद्ध स्वतंत्र दोन गुन्हे दाखल केले आहेत.
भा.न्या.सं. कलम २२३, २८१, २८५, २८९, २९२, २९३, पर्यावरण संरक्षण अधिनियमातील कलम ३ व १५, ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० मधील कलम ३, ४, ५, ६, शस्त्र कायद्यातील कलम ४/२५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अन्वये ही कारवाई करण्यात आली.