‘समतेच्या वाटेवर’ पुस्तक प्रकाशनासह "आपलं घर" बालगृहातील मुलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर; मैत्री पब्लिकेशन, वृंदावन फाउंडेशन व राष्ट्र सेवा दलाचा संयुक्त उपक्रम

शिवाजी नाईक 
_______________
नळदुर्ग, दि. २५ सप्टेंबर :

 सामाजिक परिवर्तनाची वाटचाल, समतेचा विचार आणि बालकांच्या आरोग्याची जपणूक अशा सामाजिक बांधिलकीच्या दोन महत्त्वपूर्ण उपक्रमांनी नळदुर्गमध्ये वैचारिक व सेवाभावी वातावरण निर्माण होणार आहे. संत साहित्याचे अभ्यासक व परिवर्तनवादी कार्यकर्ते सचिन पाटील यांच्या सामाजिक, वैचारिक आणि सेवामय वाटचालीचा वेध घेणाऱ्या ‘समतेच्या वाटेवर’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा तसेच ‘आपलं घर’ बालगृहातील मुलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
मैत्री पब्लिकेशन, पुणे व वृंदावन फाउंडेशन, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. ४ ऑक्टोबर  रोजी सकाळी ११ वाजता ‘आपलं घर प्रकल्प’, नळदुर्ग येथे ‘समतेच्या वाटेवर’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होणार आहे. तर संत चोखामेळा आरोग्य केंद्र, आळंदी (पुणे) व राष्ट्र सेवा दलाच्या ‘आपलं घर’ प्रकल्पाच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता बालगृहातील मुलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे.
परिवर्तनवादी विचारांना मिळणार व्यासपीठ
‘समतेच्या वाटेवर’ या पुस्तकातून सचिन पाटील यांच्या सामाजिक, वैचारिक आणि सेवामय कार्याचा वेध घेण्यात आला आहे. समता, सेवा आणि माणुसकीच्या मूल्यांना समर्पित असलेल्या या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने साहित्य, सामाजिक कार्य आणि परिवर्तनवादी विचारांशी संबंधित मान्यवर एकत्र येणार आहेत.
प्रकाशन सोहळ्यास माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांची  उपस्थिती राहणार असून अध्यक्षस्थानी माजी  खासदार डॉ. सुनीलराव गायकवाड तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विनायकराव पाटील विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

यावेळी साथी गुंड्डू पवार, प्रा. अलका सपकाळ , भैरवनाथ कानडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाचे निमंत्रक साथी संतोष बुरुंगे, मोहिनी कारंडे आणि सिद्धेश्वर माने आहेत.
बालगृहातील मुलांची आरोग्य तपासणी
दरम्यान, ‘आपलं घर’ बालगृहातील मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देत मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिरात बालकांची संपूर्ण आरोग्य तपासणी, वाढ व पोषण मूल्यांकन, आवश्यक वैद्यकीय सल्ला व मार्गदर्शन तसेच मूलभूत औषधोपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

शिबिराचे उद्घाटन बाल कल्याण समितीचे सदस्य दयानंद काळुके यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विजय महाजन, अध्यक्ष, संत चोखामेळा आरोग्य केंद्र, आळंदी तसेच गोरख जगताप, सचिव, ‘आपलं घर’ प्रकल्प व्यवस्थापन समिती, नळदुर्ग उपस्थित राहणार आहेत.

यावेळी डॉ. शशिकांत सोमवंशी, संदीप चवले,  सौदागर पवार यांचीही उपस्थिती राहणार आहे. या उपक्रमाचे संयोजन साथी संतोष बुरुंगे यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

विचार आणि सेवेला एकाच व्यासपीठाची जोड
एकीकडे ‘समतेच्या वाटेवर’ या पुस्तकातून सामाजिक समता, सेवा आणि माणुसकीचा विचार पुढे नेण्याचा प्रयत्न होत असताना दुसरीकडे बालगृहातील मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रत्यक्ष आरोग्यसेवा उपलब्ध करून दिली जात आहे. त्यामुळे नळदुर्गातील हे दोन्ही उपक्रम विचार आणि कृती यांचा संगम घडविणारे ठरणार आहेत.

समतेचा विचार आणि निरोगी बालपण या दोन्ही सामाजिक मूल्यांना बळ देणाऱ्या या उपक्रमांना नागरिकांनी उपस्थित राहून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
 
Top