दुष्काळाच्या झळा सोसताना जुगाराचा विळखा; नळदुर्ग परिसरात कारवाईची मागणी
वसंतनगरात ऑनलाइन चक्री जुगार सुरू असल्याचा आरोप; सलगरा दिवटीसह जळकोट, अणदूर, इटकळ बीटमध्ये पत्त्यांचे क्लब सुरू असल्याची नागरिकांची तक्रार
नळदुर्ग, दि. २२ सप्टेंबर :
एकीकडे दुष्काळाच्या तीव्र झळांनी सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले असताना सणासुदीच्या काळात नळदुर्ग शहर व परिसरात कथित चक्री जुगार आणि पत्त्यांचे क्लब पुन्हा सुरू झाल्याची चर्चा आहे. या प्रकारामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबांवर अधिक संकट ओढवण्याची शक्यता व्यक्त करीत नागरिकांनी पोलिस प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
नळदुर्ग शहरातील वसंतनगर परिसरात ऑनलाइन चक्री जुगार सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. यापूर्वीही शहरात ऑनलाइन जुगार सुरू झाल्यानंतर विद्यार्थी, शेतकरी कुटुंबातील युवक तसेच विविध घटकांतील नागरिक त्याच्या आहारी गेल्याचे प्रकार घडल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. त्यावेळी पोलिसांनी कारवाई करून हा प्रकार बंद केला होता. आता काही कालावधीनंतर पुन्हा अशाच प्रकाराला सुरुवात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, नळदुर्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सलगरा दिवटी बीटमध्ये पत्त्यांचा क्लब सुरू असल्याची तक्रार पुढे आली आहे. तसेच जळकोट, अणदूर आणि इठकळ बीटमध्येही चक्री जुगार व पत्त्यांचे क्लब सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. या तक्रारींची पोलिसांनी प्रत्यक्ष पडताळणी करून दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
सध्या तुळजापूर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून शेती व रोजगारावर त्याचा परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत जुगाराच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक फसवणूक अथवा नुकसान होऊ नये, यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी मनोहर पाटील आणि नळदुर्ग पोलिस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी शहरासह ग्रामीण बीटमध्ये सुरू असल्याच्या तक्रारींची चौकशी करून बेकायदेशीर जुगार आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पोलिसांच्या कारवाईकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.