अज्ञात चोरट्यांचा घरफोड्यांचा धडाका; ७.२९ लाखांचा ऐवज लंपास ;
येवती व तुळजापुरात अज्ञात चोरट्यांकडून घरांचे कडी-कोंडे उचकटून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम लंपास

नळदुर्ग/ तुळजापूर, दि. २१ सप्टेंबर :

तुळजापूर तालुक्यातील येवती आणि तुळजापूर शहरात अज्ञात चोरट्यांनी दोन घरांना लक्ष्य करून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम व गृहउपयोगी साहित्य असा एकूण ७ लाख २९ हजार १५० रुपयांचा ऐवज लंपास केला. सलग घडलेल्या या घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

येवती येथील महेश ज्ञानोबा भरगंडे (वय ४७) यांच्या घराचा कडी-कोंडा उचकटून चोरट्यांनी १७ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते १९ सप्टेंबर रोजी सकाळी ७.१० वाजेपर्यंतच्या कालावधीत घरात प्रवेश केला. घरातील कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम व गृहउपयोगी साहित्य असा ३ लाख ९९ हजार १५० रुपयांचा ऐवज चोरून नेला.

याप्रकरणी भरगंडे यांनी २० सप्टेंबर रोजी नळदुर्ग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(५), ३३१(४) व ३०५(अ) अन्वये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, तुळजापूर शहरातील एस.टी. कॉलनीतही घरफोडीची घटना घडली. अन्नपूर्णा सुभाषराव पांचाळ (वय ३८) यांच्या घराचा कडी-कोंडा तोडून चोरट्यांनी १८ सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते १९ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या दरम्यान घरात प्रवेश केला. कपाटातील ५६ ग्रॅम सोन्याचे दागिने व ५० हजार रुपये रोख, असा एकूण ३ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.

या प्रकरणी अन्नपूर्णा पांचाळ यांनी २० सप्टेंबर रोजी तुळजापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(५), ३३१(४) व ३०५(अ) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top