श्री तुळजाभवानीच्या नवरात्रोत्सवाचा शंखनाद; ११ ऑक्टोबरला घटस्थापना
शिवाजी नाईक
____________
तुळजापूर, दि. २१ सप्टेंबर :
श्री क्षेत्र तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची तयारी सुरू झाली असून, यंदाच्या धार्मिक कार्यक्रमांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ११ ऑक्टोबर रोजी घटस्थापनेने नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे. नवरात्र काळात विविध अलंकार महापूजा, छबिना तसेच पारंपरिक धार्मिक विधी होणार आहेत.नवरात्रोत्सवापूर्वी ३ ऑक्टोबरपासून देवीच्या मंचकी निद्रेचा धार्मिक विधी सुरू होणार आहे.
दि. ११ ऑक्टोबर रोजी पहाटे देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात येईल. त्यानंतर दुपारी घटस्थापना होणार असून, रात्री छबिना सोहळा होईल. १२ ते १४ ऑक्टोबरदरम्यान नित्योपचार पूजा आणि छबिना असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
१५ ऑक्टोबर रोजी ललिता पंचमीनिमित्त रथ अलंकार महापूजा होणार आहे. त्यानंतर १६ ऑक्टोबरला मुरली अलंकार, १७ ऑक्टोबरला शेषशाही अलंकार आणि १८ ऑक्टोबरला भवानी तलवार अलंकार महापूजा होणार आहे. नवरात्रातील या प्रमुख दिवसांतही छबिना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
१९ ऑक्टोबर रोजी दुर्गाष्टमीचा मुख्य धार्मिक सोहळा होणार असून, महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजेसह वैदिक होम-हवन केले जाणार आहे. २० ऑक्टोबरला होमावरील धार्मिक विधी आणि घटोत्थापनानंतर रात्री नगरहून येणाऱ्या पलंग व पालखीची मिरवणूक काढण्यात येणार आहे.
नवरात्र महोत्सवातील पारंपरिक सिमोल्लंघनाचा सोहळा २१ ऑक्टोबर रोजी पहाटे होणार आहे. या सोहळ्याने नवरात्रातील प्रमुख धार्मिक कार्यक्रमांची सांगता होणार आहे.
शारदीय नवरात्रासाठी राज्याच्या विविध भागांतून तसेच परराज्यांतून मोठ्या संख्येने भाविक तुळजापूरमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर दर्शन व्यवस्था, वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि आरोग्य सुविधांचे नियोजन करण्याचे आव्हान प्रशासनासमोर राहणार आहे.
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने तुळजापूर नगरीत धार्मिक वातावरणाबरोबरच भाविकांच्या स्वागतासाठी विविध तयारीला वेग आला आहे.