वरुणराजाला साकडे; सिद्ध गरिबानाथ मठात पर्जन्य यज्ञ; दुष्काळसदृश परिस्थितीने चिंता वाढली; पर्जन्यवृष्टीसाठी वैदिक मंत्रोच्चारात धार्मिक विधी
तुळजापूर, दि. २० सप्टेंबर :
पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीत वरुणराजाला साकडे घालत पर्जन्यवृष्टी व्हावी, शेतकरी, पशुधन आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील सिद्ध गरिबानाथ (दशावतार) मठात रविवारी (दि. २०) पर्जन्यवृष्टी यज्ञ करण्यात आला.
वैदिक मंत्रोच्चार आणि धार्मिक विधींनी मठ परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला.
महाराष्ट्रातील अनेक भागांत अपेक्षित पाऊस न झाल्याने शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. या पार्श्वभूमीवर जनकल्याण, वेळेवर पर्जन्यवृष्टी आणि सर्वत्र सुख-समृद्धी नांदावी, या मंगलकामनेसाठी सिद्ध गरिबानाथ मठात पर्जन्यवृष्टी यज्ञाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी रणसम्राट बाल मंडळ तसेच पूजनीय महंत योगी मावजीनाथ महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. यज्ञासाठी श्री. व सौ. प्रवीण कदम केशव यांनी यजमान म्हणून सहभाग घेतला.
वैदिक मंत्रोच्चाराच्या वातावरणात पर्जन्यवृष्टी यज्ञाचा विधी पार पडला. यज्ञाचे पौरोहित्य सुदेश जेवळीकर, वेदांत जेवळीकर, सुमित जेवळीकर, सर्वोत्तम जेवळीकर, मनोज हिराळकर आणि राजेश कुलकर्णी यांनी केले.
पर्जन्यवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या शेतशिवाराला पाणी मिळावे, पशुपक्ष्यांसह सर्व जीवसृष्टीला दिलासा मिळावा आणि तुळजापूर परिसरात सुख-समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. यज्ञाच्या निमित्ताने मठ परिसरात दिवसभर धार्मिक वातावरण निर्माण झाले होते.
"दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जनकल्याणासाठी धार्मिक विधी; महंत योगी मावजीनाथ महाराजांची प्रमुख उपस्थिती"