शब्दांच्या मैफलीत रंगला मुरूमचा साहित्यिक सोहळा, नामवंत कवींच्या बहारदार काव्य वाचनाने रसिकांची मने जिंकली
मुरूम, दि. २४ सप्टेंबर :
कधी सामाजिक वास्तवाचा आरसा, कधी ग्रामीण जीवनातील गंमत, तर कधी मानवी नात्यांचा हळवा स्पर्श... अशा विविध भावछटांनी मुरूम येथील श्री. माधवराव पाटील महाविद्यालयातील सांस्कृतिक सभागृहात काव्याची मैफल रंगली. नामवंत कवींच्या बहारदार काव्यवाचनाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिल्याने कवी संमेलनाला साहित्यिक रंगत लाभली.
अंतर्गत गुणवत्ता आश्वासन कक्ष, सांस्कृतिक विभाग आणि श्रीराम गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. २२) कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार अध्यक्षस्थानी होते. उपनगराध्यक्ष रमेश चव्हाण, संस्थेचे संचालक प्रा. डॉ. सतीश शेळके, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश्वर होगाडे, मुख्याध्यापक उल्हास घुरघुरे, श्रीराम गणेश मंडळाचे अध्यक्ष श्रीराम कुलकर्णी, डॉ. रवींद्र गायकवाड, प्रा. गोपाळ कुलकर्णी आदी उपस्थित होते.
बालमनापासून सामाजिक वास्तवापर्यंत...
छत्रपती संभाजीनगरचे कविवर्य गणेश घुले यांनी बालमन, शिक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन, माणुसकी, नातेसंबंध आणि सामाजिक वास्तवाला स्पर्श करणाऱ्या आशयघन कविता सादर केल्या. साध्या शब्दांत प्रभावी आशय मांडत त्यांनी रसिकांना अंतर्मुख केले. संघर्ष, प्रेम आणि जीवनमूल्यांचे विविध पदर त्यांच्या कवितांतून उलगडले.
पुण्याचे डॉ. स्वप्नील चौधरी यांनी समकालीन सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणाऱ्या कविता सादर केल्या. त्यांच्या चर्चेत असलेल्या ‘चल दंगल समजून घेऊ’ या रचनेतून सामाजिक घटनांकडे चिकित्सक नजरेने पाहण्याचा संदेश दिला. त्यांच्या सादरीकरणाला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला.
परभणीचे कवी संतोष नारायणकर यांनी ग्रामीण बोलीतील विनोदी ढंगातून सभागृहात हास्याची कारंजी उडवली. ‘मामाला माझ्या’ या लोकप्रिय रचनेला रसिकांनी भरभरून दाद दिली. विनोदासोबतच ग्रामीण जीवन, नाती आणि सामाजिक वास्तवाचे चित्रण त्यांच्या कवितेतून प्रभावीपणे उमटले.
पुण्याचे कवी श्रीराम पोतदार यांनी समाज, संस्कृती, पर्यावरण, युवकांचे प्रश्न, स्त्रीशक्ती, शेतकरी, ग्रामीण जीवन, प्रेम, विद्यार्थी-शिक्षक नाते आणि समकालीन वास्तव अशा विविध विषयांना कवितेच्या माध्यमातून भिडवले.
स्थानिक कवींनीही रंगत वाढवली
मुरूमचे निर्मलकुमार लिमये आणि आशिष वेदपाठक यांनीही आपल्या कविता सादर करून काव्यमैफलीत स्थानिक साहित्यिक रंग भरला. विविध विषय, वेगवेगळ्या शैली आणि भावनांचा सुंदर मिलाफ झाल्याने संमेलनाला बहुआयामी स्वरूप प्राप्त झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. राम बजगिरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले यांनी केले, तर श्रीराम कुलकर्णी यांनी आभार मानले. महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी तसेच साहित्यप्रेमी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.