मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी इंगळेंना पोलिसांनी घेतले ताब्यात; अखेर करजखेड्यात थेट भेट!
दुष्काळाची दाहकता फडणवीसांसमोर मांडत स्वाभिमानीची शेतकरी मदतीसाठी आक्रमक भूमिका
तुळजापूर, दि. २३ सप्टेंबर :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळ पाहणी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष रवींद्र भीमाशंकर इंगळे यांना तुळजापूर पोलिसांनी पोलीस ठाण्यात आणले. मात्र, पोलिसांच्या या कारवाईने इंगळे यांची शेतकऱ्यांच्या व्यथा मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्याची भूमिका अधिकच ठाम झाली. अखेर उपविभागीय पोलिस अधिकारी मनोहर पाटील यांच्या मध्यस्थीनंतर इंगळे यांना करजखेडा येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन देण्यास परवानगी देण्यात आली.
पोलिस बंदोबस्तात करजखेडा येथे पोहोचलेल्या इंगळे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत दुष्काळाची तीव्रता त्यांच्या निदर्शनास आणून दिली.
“मुख्यमंत्री साहेब, यंदाचा दुष्काळ अत्यंत कठीण आहे. शासनाची भरीव मदत मिळाल्याशिवाय शेतकरी या संकटातून सावरणे शक्य नाही. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी,” अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपण दुष्काळाची पाहणी करण्यासाठीच आलो असून, परिस्थितीची गंभीरता निदर्शनास आली आहे. या पार्श्वभूमीवर शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील, अशी ग्वाही दिल्याचे इंगळे यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी इंगळे यांना ताब्यात घेतल्याने काही काळ वातावरणात तणाव निर्माण झाला होता. मात्र, अखेर शेतकऱ्यांचा आवाज थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्यात स्वाभिमानीला यश आले.
यावेळी धनाजी पेंदे, विष्णू काळे, शहाजी सोमवंशी, तात्या पवार, भोजने, मनोज सरवदे, महादेव टेकाळे, राजेंद्र हाके यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.