भुतांच्या साम्राज्यात गणरायाचा जल्लोष! नळदुर्गच्या ‘भूत बंगल्या’ने उडवली नागरिकांची भंबेरी
नळदुर्ग, दि. २३ सप्टेंबर :
गणेशोत्सवातील पारंपरिक धार्मिक वातावरणाला थराराची किनार देत शास्त्री चौकातील जय हनुमान तरुण गणेश मंडळाने यंदा ‘भूत बंगला’ हा आगळावेगळा देखावा साकारला आहे. भेसूर हालचाली, काळोखातून उमटणारे आवाज, लक्षवेधी प्रकाशयोजना आणि प्रभावी ध्वनीसंयोजनामुळे हा देखावा गणेशभक्तांसह नागरिकांच्या कुतूहलाचा विषय ठरला आहे.
जय हनुमान तरुण गणेश मंडळाकडून दरवर्षी सामाजिक, धार्मिक तसेच मनोरंजनात्मक विषयांवर वैविध्यपूर्ण देखावे सादर केले जातात. यंदा ‘भूत बंगला’च्या माध्यमातून मंडळाने या परंपरेत वेगळा प्रयोग केला आहे. देखाव्यातील थरारक दृश्ये आणि कलाकारांच्या जिवंत अभिनयामुळे परिसरात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले असून, हा अनोखा देखावा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.
"दरम्यान, सोमवारी मंडळाच्या वतीने गणरायाची आरती लखन कांबळे यांनी सपत्नीक केली. तसेच कै. मल्लिनाथ शिवाजी कांबळे यांच्या स्मरणार्थ भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले."
‘भूत बंगल्या’च्या नाट्यमय सादरीकरणात नीरज गेहरवार, आरक्ष काळे, ओम ठाकूर, अमित ठाकूर, राहुल कोकणे, समर्थ ठाकूर, समर्थ घोडके, समर्थ काळे, अनिल वाघमारे, संजय फरताळे आदी कलाकार सहभागी झाले आहेत.
मंडळाचे अध्यक्ष गजानन हळदे, उपाध्यक्ष राहुल ठाकूर व किरण दुस्सा, कोषाध्यक्ष अजय कांबळे व नीरज गेहरवार, सहसचिव आकाश कोकणे व लखन कोकणे यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते देखाव्याच्या उभारणीसाठी परिश्रम घेत आहेत.