आरळी बुद्रुकच्या कुस्ती आखाड्यात होर्टीच्या मल्लांची दणदणीत कामगिरी!
लालबहादूर शास्त्री विद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांची विजयी झेप; तीन मुलींना सुवर्णयश
नळदुर्ग, दि. २३ सप्टेंबर :
आरळी बुद्रुक (तुळजापूर) येथे झालेल्या तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत होर्टी येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयाच्या मल्लांनी दमदार कामगिरी करत चार प्रथम क्रमांक पटकावले. यात तीन मुलींनी आपल्या गटात अव्वल ठरत कुस्तीच्या आखाड्यात विद्यालयाचा झेंडा उंचावला.
५७ किलो वजनी गटात कार्तिकी दत्ता भोसले, ५३ किलो गटात अश्विनी सुभाष भोसले, ४८ किलो गटात मंजिरी दत्ता घोडके यांनी मुलींच्या गटातून प्रथम क्रमांक मिळवला. मुलांच्या ४८ किलो वजनी गटात शंभुराजे परमेश्वर भोसले याने प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजेतेपद पटकावले.
या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक विश्वनाथ कल्लशेट्टी, सर्व शिक्षक, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष दत्ता भोसले तसेच ग्रामस्थांनी यशस्वी मल्लांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशामुळे विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी भर पडली असून, पुढील स्पर्धांसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.