राज्यस्तरीय लाठी चॅम्पियनशिपमध्ये धिरज पवार, वीर कोंगुळवार यांना सुवर्णपदक; देशपातळीवरील स्पर्धेसाठी निवड

उमरगा, दि. २३ सप्टेंबर : 

विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्रातही प्रावीण्य मिळवावे. खेळामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच आत्मविश्वास, शिस्त आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षण आणि क्रीडा या दोन्ही क्षेत्रांत सर्वगुणसंपन्न होणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक तथा कवी भूमिपुत्र वाघ यांनी केले.

उमरगा येथील जिवलगा सामाजिक बहुउद्देशीय संस्था, गुंजोटी संचलित डॉ. रामानुजन प्री-प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नागपूर येथे झालेल्या ७ व्या राज्यस्तरीय लाठी चॅम्पियनशिप स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. चि. धिरज लक्ष्मण पवार याने एकम लाठी प्रकारात, तर चि. वीर चैतन्य कोंगुळवार याने पंचम लाठी प्रकारात आपल्या गटातून खेळताना सुवर्णपदक पटकावले. या यशाबद्दल शाळेच्या वतीने दोन्ही विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी भूमिपुत्र वाघ बोलत होते.

भूमिपुत्र वाघ यांनी विद्यार्थ्यांमध्ये मिसळून संवाद साधत क्रीडा क्षेत्राचे महत्त्व पटवून दिले. माजी गटशिक्षणाधिकारी सुभाष चव्हाण, क्रीडा शिक्षक महंमदरफी शेख, पत्रकार सचिन बिद्री व महेश अंबर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या यशाचे कौतुक केले.

देशपातळीवरील स्पर्धेसाठी निवड
राज्यस्तरीय स्पर्धेतील दमदार कामगिरीनंतर धिरज पवार व वीर कोंगुळवार यांची देशपातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. लाठी हा क्रीडा प्रकार विद्यार्थ्यांसाठी भविष्यात संधी निर्माण करणारा असून, सातत्यपूर्ण सराव, मेहनत आणि शिस्तीच्या जोरावर पुढील स्तरावरही उत्कृष्ट कामगिरी करावी, अशी अपेक्षा क्रीडा शिक्षक महंमदरफी शेख यांनी व्यक्त केली.
आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उंचावण्याचा धिरजचा निर्धार
“नागपूर येथील राज्यस्तरीय लाठी चॅम्पियनशिपमध्ये एकम लाठी प्रकारात सुवर्णपदक मिळाले. या यशासाठी शाळेचे अध्यक्ष महेश अंबर व क्रीडा शिक्षक महंमदरफी शेख यांचे मार्गदर्शन लाभले. भविष्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार आहे,” असा निर्धार सुवर्णपदक विजेता धिरज लक्ष्मण पवार याने व्यक्त केला.

कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष महेश अंबर, सचिव गुलाब माळी, प्रमुख मार्गदर्शक तथा माजी गटशिक्षणाधिकारी सुभाष चव्हाण, पत्रकार अंबादास जाधव, सचिन बिद्री, लक्ष्मण पवार, विकास गायकवाड, नसरोद्दीन फकीर, महादेव पाटील, राहुल थोरात, विशाल देशमुख, प्राचार्य युसूफ मुल्ला, अमोल पाटील, महेबुब पठाण तसेच विद्यार्थ्यांचे पालक भक्ती लक्ष्मण पवार व पूनम चैतन्य कोंगुळवार उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहशिक्षक गंगा अंबर, दुर्गाराणी बिद्री, श्रीनिधी गोडेकर, संध्या ममाळे, कांचन खंडाळकर, कल्याणी बबलादे, अश्विनी मुळे, उज्वला धुमाळ, प्राजक्ता गुरव, रंजना मुळे, मंजुश्री घोंगडे, स्वाती जेवळे व धनश्री अंबर यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व प्रास्ताविक दुर्गा बिद्री यांनी केले, तर गंगा अंबर यांनी आभार मानले. कार्यक्रमास विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top