रायफल शूटिंगमध्ये तैबा सौदागरचे सुवर्ण; कुस्तीत श्रावणी मुळजेची बाजी
दोन्ही खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड

नळदुर्ग, दि. २८ सप्टेंबर :
क्रीडा क्षेत्रात नळदुर्ग येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी दमदार कामगिरी करत महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. १९ वर्षे वयोगटातील जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. तैबा सौदागर हिने सुवर्णपदक पटकावत विभागीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे.
रविवार, दि. २७ सप्टेंबर रोजी धाराशिव येथे जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील महाविद्यालयांतून प्रत्येकी एक स्पर्धक सहभागी झाला होता. या स्पर्धेत तैबा सौदागर हिने अचूक नेमबाजी करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

दरम्यान, जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेतही महाविद्यालयाच्या कु. श्रावणी मुळजे हिने ५२ किलो वजनगटात दमदार कामगिरी करत विजेतेपद मिळविले. तिचीही विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
दोन्ही विद्यार्थिनींच्या या उल्लेखनीय यशाबद्दल बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, उपाध्यक्ष डॉ. अभय शहापूरकर, सचिव उल्हास बोरगांवकर, रामचंद्र आलुरे, प्राचार्य डॉ. सुभाष राठोड, उपप्राचार्य तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. विभागीय स्पर्धेतही उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी दोन्ही खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या.



 
Top