“पोक्सो तपासाची दिशा स्पष्ट; धाराशिव मध्ये ५२ पोलिस अधिकाऱ्यांना
कायद्याचे धडे”
धाराशिव, दि. ३० सप्टेंबर :
पोक्सो कायद्यांतर्गत गुन्ह्यांचा तपास करताना कायदेशीर प्रक्रिया अचूकपणे राबविण्या सोबतच पीडित बालकांशी संवेदनशील व बालस्नेही पद्धतीने वर्तन करण्याची गरज आहे. याच उद्देशाने धाराशिव जिल्ह्यातील १८ पोलीस ठाण्यांमधील ५२ पोलीस अधिकाऱ्यांसाठी पोक्सो कायद्यावर एकदिवसीय प्रशिक्षण घेण्यात आले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय आणि युवा ग्राम विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रशिक्षण सभागृहात मंगळवारी हे प्रशिक्षण पार पडले.
एफआयआरपासून वैद्यकीय तपासणीपर्यंत प्रक्रियेचे धडे
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तथा दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) भाग्यश्री पाटील यांनी पोक्सो प्रकरणातील कायदेशीर प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली. गंभीर गुन्हा दाखल झाल्यानंतर २४ तासांच्या आत एफआयआरची प्रत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे पाठविणे, पीडित बालिकेची तातडीने वैद्यकीय तपासणी करणे, तिचा जबाब नोंदविणे तसेच बालकास बाल कल्याण समितीसमोर सादर करण्याची प्रक्रिया त्यांनी सोप्या भाषेत स्पष्ट केली.
‘मनोधैर्य’च्या लाभासाठी कागदपत्रांवर मार्गदर्शन
अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी पोक्सो प्रकरणातील पीडितांना ‘मनोधैर्य योजने’चा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, बँक खाते उघडण्याची प्रक्रिया आणि विहित नमुन्यात अर्ज सादर करण्याबाबत मार्गदर्शन केले.
बाल कल्याण समितीचे अध्यक्ष विजयकुमार माने यांनी बालकाला समितीसमोर सादर करताना घ्यावयाची काळजी तसेच आवश्यक कागदपत्रांची माहिती दिली. प्रज्ञा बनसोडे यांनी महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध बालकल्याणकारी योजनांची माहिती दिली.
ॲड. संजय सेंगर यांनी पोक्सो कायद्यातील तरतुदी, तपासाची प्रक्रिया, बालस्नेही तपास पद्धती, ‘सपोर्ट पर्सन’ची भूमिका, पीडित बालिकेचे पुनर्वसन तसेच आवश्यक फॉर्म व अर्ज कुठे सादर करावेत, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
ॲड. अभय पाथ्रुडकर यांनीही पोक्सो कायद्यातील महत्त्वाच्या कायदेशीर तरतुदींवर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एच. पी. देशमुख यांनी केले. यावेळी युवा ग्राम विकास मंडळाच्या गेल्या ४० वर्षांतील कार्याची माहिती देण्यात आली.
या प्रशिक्षणास सचिन पांडकर, मारुती शेळके, इकबाल सय्यद, भाग्यश्री पाटील, विजयकुमार माने, ॲड. संजय सेंगर, ॲड. अभय पाथ्रुडकर, वैशाली पाटील, विकास चव्हाण, मैना भोसले, सुजाता माळी आणि प्रज्ञा बनसोडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनासाठी इकबाल महेबूब सय्यद, अतिश दशरथ सरफळे, संतोष रेपे, संजीव आगळे, नीता बहीर, ॲड. अनिता शिंदे आणि राऊ भोसले यांनी परिश्रम घेतले.