अथलेटिक्समध्ये नळदुर्गच्या खेळाडूंची सुवर्ण भरारी ; जिल्हास्तरीय स्पर्धेत चमकदार कामगिरी; विभागीय स्पर्धेसाठी निवड
नळदुर्ग, दि. २९ सप्टेंबर :
धाराशिव येथे सोमवार (दि. २८) रोजी झालेल्या जिल्हास्तरीय अथलेटिक्स स्पर्धेत नळदुर्ग येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर महाविद्यालयाच्या खेळाडूंची आगामी विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
महाविद्यालयाचे रितेश नाईक, बसवराज कलशेट्टी, अथर्व कांबळे आणि ओम हागलगुंडे यांनी विविध मैदानी स्पर्धांमध्ये प्रभावी कामगिरी केली. हातोडा फेक स्पर्धेत रितेश नाईक व अथर्व कांबळे यांनी प्रथम क्रमांक पटकावत सुवर्ण कामगिरी केली. बसवराज कलशेट्टी याने थाळीफेक आणि
क्रॉसकंट्री ओम हागलगुंडे याने ८०० मीटर व ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळविले.
या सर्व खेळाडूंची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाल्याने महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
खेळाडूंच्या या यशाबद्दल प्राचार्य डॉ. सुभाष राठोड यांनी त्यांचा सत्कार करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपप्राचार्य डॉ. अशोक कदम, कार्यालयीन अधीक्षक धनंजय पाटील, क्रीडा शिक्षक डॉ. कपिल सोनटक्के, डॉ. हंसराज जाधव, प्रा. मोतीराम पवार, प्रा. डॉ. जयश्री घोडके आदी उपस्थित होते.