नळदुर्गमध्ये रेखाकलेचा रंग भरला; ६०१ विद्यार्थी परीक्षेला; १५ कक्षांत एलिमेंटरी, इंटरमिजिएट परीक्षा; २० शाळांचा सहभाग
नळदुर्ग, दि. ३० सप्टेंबर :
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देणाऱ्या शासकीय रेखाकला परीक्षेने नळदुर्ग येथील जिल्हा परिषद प्रशालेत रंगत आणली आहे.
कला संचालनालय महाराष्ट्र राज्य तर्फे घेण्यात येणाऱ्या शासकीय रेखाकला परीक्षा 2026
एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेसाठी तब्बल ६०१ विद्यार्थी सहभागी झाले असून, दि. २८ सप्टेंबरपासून सुरू झालेली परीक्षा दि. १ ऑक्टोबर रोजी अंतिम पेपरने पूर्ण होणार आहे.
नळदुर्ग येथील परीक्षा केंद्रावर जिल्हा परिषद तसेच खासगी अशा २० शाळांमधील विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येत आहे. परीक्षेसाठी केंद्रावर १५ कक्षांची व्यवस्था करण्यात आली असून, परीक्षा सुरळीत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी केंद्रप्रमुख म्हणून मुख्याध्यापक निजाम इनामदार, तर केंद्रसंचालक म्हणून अफझल शेख कार्यरत आहेत. त्यांच्या समवेत १५ पर्यवेक्षक परीक्षा प्रक्रियेची जबाबदारी सांभाळत आहेत.
या परीक्षेत तुळजापूर,नळदुर्गसह हंगरगा, जळकोट, आलियाबाद, चिवरी, शहापूर, तुळजाभवानी साखर कारखाना, होर्टी, आरळी, काटगाव, नंदगाव, देवकुरळी, मंगरूळ, गंधोरा व कुन्सावळी आदी ठिकाणच्या शाळांतील विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
रेखाकलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला, सर्जनशीलतेला आणि कलात्मक अभिव्यक्तीला चालना मिळत असल्याने या परीक्षेकडे विद्यार्थी व पालकांचे विशेष लक्ष लागले आहे.