सर्पदंशाने मंदिर पुजाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

शाहापूर पंचक्रोशीत शोककळा; धार्मिक कार्यातील सक्रिय व्यक्तिमत्त्व हरपले

नळदुर्ग, दि. २७ सप्टेंबर :

तुळजापूर तालुक्यातील शाहापूर येथील ग्रामदैवत श्री लक्ष्मी नरसिंह मंदिरासह विठ्ठल-रुक्मिणी व हनुमान मंदिराचे पुजारी काशिनाथ भगवान गिरी (वय ५२) यांचा सर्पदंश झाल्यानंतर उपचारादरम्यान सोलापूर येथील रुग्णालयात मृत्यू झाला. रविवारी पहाटेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने शाहापूर गावासह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

काशिनाथ गिरी यांना चार-पाच दिवसांपूर्वी पहाटे साडेचार ते पाचच्या सुमारास घरातच विषारी सापाने कानाला दंश केला. दंश झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सापाला ठार केले व पत्नीला घटनेची माहिती दिली. त्यानंतर शेजारी जितेंद्र पाटील यांना कळवून त्यांना तातडीने खासगी वाहनातून सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मात्र, उपचार सुरू असतानाच रविवारी पहाटे दोनच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. काशिनाथ गिरी हे शाहापूर पंचक्रोशीतील विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये सातत्याने सहभागी होत सामाजिक व धार्मिक कार्यात योगदान देत होते. त्यांच्या अकस्मात निधनाने ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व विवाहित मुलगी असा परिवार आहे. शेतकरी संघर्ष समितीचे नेते दिलीप जोशी यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली.


 
Top