दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एक लाखांची मदत द्या,शेतकरी संघर्ष समितीसह शिवसेनेचे निवेदन; उजनीचे पाणी तुळजापूरला देण्याचीही मागणी
तुळजापूर, दि. २६ सप्टेंबर :
तुळजापूर तालुक्यात पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, तालुक्यातील तातडीने बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीसह शिवसेना उबाठाच्या वतीने शनिवारी शिवसेनेचे (उबाठा) माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह संबंधिताना निवेदन देत विविध मागण्या मांडल्या आहेत.
तुळजापूर तालुक्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने सोयाबीनसह अन्य पिकांचे नुकसान झाले आहे. सन २०२३ पासून तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होत असून, मागील वर्षी अतिवृष्टी आणि यंदा पावसाच्या खंडाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे शासनाने केवळ कागदोपत्री उपाययोजना न करता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
उजनीचे पाणी तुळजापूरला आणण्याची मागणी
तुळजापूर तालुक्यातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातून रामधरा तलावामार्गे तुळजापूरला पाणी आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली आहे. या योजनेबाबत शासनस्तरावर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
पीकविमा व ऊस बिलाचा प्रश्नही ऐरणीवर
कृषी विभागाकडील पीकविमा अनुदानासह प्रलंबित ऊस बिले तातडीने शेतकऱ्यांना अदा करावीत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. तसेच धाराशिव जिल्ह्यात कृषी विभागाकडे सादर केलेल्या विविध प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाजाबाबत आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
नळदुर्ग-अक्कलकोट महामार्गाचा मुद्दा
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५२ वरील नळदुर्ग-अक्कलकोट मार्गासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने दिलेल्या आदेशाचे पालन व्हावे, अशी मागणीही समितीने केली आहे. न्यायालयीन आदेशाच्या अंमलबजावणीबाबत संबंधित विभागाने तातडीने कार्यवाही न केल्यास न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी पुढील कायदेशीर पाऊल उचलण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
याशिवाय एक रुपयात पीकविमा शेतकरी हिताची योजना पुन्हा सुरू करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
शेतकरी संघर्ष समितीचे समन्वयक दिलीप जोशी यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले असून, तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
शिवसेनेचे कमलाकर चहाण, सरदारसिंग ठाकुर, संतोष पुदाले, शाम कनकधर, सोमा मेहेत्रे नेताजी महाबोले, चंदु सगरे, खंडु माने, दिलीप पाटील, पंडीत पाटील, गुलाब शिंदे, महेश घोडके, मानसिंग ठाकूर, दशरथ ठाकूर, बालाजी ठाकूर, प्रताप ठाकूर आदी उपस्थित होते.