नेदरलॅंडला सोयाबीन फूड ऑईल निर्यातीचे आमिष;  सव्वासहा लाखांची फसवणूक!
आंतरराष्ट्रीय कागदपत्रांच्या नावाखाली पैसे उकळल्याचा आरोप; नोएडातील चौघांविरुद्ध गुन्हा

तुळजापूर, दि. २६ सप्टेंबर :

नेदरलॅंड येथे सोयाबीन फूड ऑईलची निर्यात करून देण्याचे आमिष दाखवत, आंतरराष्ट्रीय निर्यातीसाठी आवश्यक कागदपत्रे तयार करण्याच्या नावाखाली तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द येथील रामकृष्ण हरी कृषी व पणन सेवा सहकारी संस्थेची तब्बल ६ लाख ७५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तामलवाडी पोलिस ठाण्यात नोएडातील चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(२), ३१८(४) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत विवेकानंद सुदर्शन जाधव (वय २०, रा. मसला खुर्द, ता. तुळजापूर) यांनी २५ सप्टेंबर २०२६ रोजी तामलवाडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रणविर सिंग, आकांक्षा, भुपेंद्र सिंग व रिया ठाकूर (सर्व रा. नोएडा, उत्तर प्रदेश) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

निर्यातीचे आमिष दाखवून विश्वास संपादन
फिर्यादीचे वडील सुदर्शन गोरख जाधव यांच्या नावे असलेल्या रामकृष्ण हरी कृषी व पणन सेवा सहकारी संस्था, मसला खुर्द यांच्याशी आरोपींनी संपर्क साधला. 'एंकाश ग्लोबल'च्या माध्यमातून सोयाबीन फूड ऑईल युरोपातील नेदरलॅंड येथे निर्यात करून देतो, तसेच त्यासाठी आवश्यक आंतरराष्ट्रीय कागदपत्रांची पूर्तता करून देण्याचे आश्वासन आरोपींनी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या आश्वासनामुळे विश्वास निर्माण झाल्यानंतर आरोपींनी निर्यात प्रक्रियेसाठी विविध कारणे सांगून पैसे मागितले. त्यानुसार आरटीजीएस तसेच यूपीआयच्या माध्यमातून वेळोवेळी एकूण ६ लाख ७५ हजार रुपये संबंधित खात्यावर जमा करण्यात आल्याचे पोलिस तक्रारीत म्हटले आहे.
पैसे घेतल्यानंतर फसवणूक झाल्याचा आरोप
फिर्यादीनुसार, आरोपींनी मोहित शर्मा यांच्या नावाने असलेल्या बँक खात्यावर ही रक्कम स्वीकारली. मात्र, पैसे घेतल्यानंतरही सांगितल्याप्रमाणे निर्यातीची प्रक्रिया पूर्ण न करता आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

३ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजल्यापासून २७ डिसेंबर २०२५ रोजी रात्री साडेदहा वाजेपर्यंतच्या कालावधीत ही आर्थिक देवाणघेवाण झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तामलवाडी पोलिसांनी फिर्यादीच्या जबाबावरून गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
 
Top