मध्यरात्री पोलिसाचा जुगार अड्ड्यावर छापा; २२ जुगारी जेरबंद, तिरट जुगारातून रोकड मोबाईल, चारचाकीसह तब्बल सव्वा सतरा लाखांचा मुद्देमाल जप्त
धाराशिव, दि. २६ सप्टेंबर :
वाशी तालुक्यातील मांडवा येथील पारधी पेढी परिसरात सुरू असलेल्या लाखो रुपयांच्या तिरट जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मध्यरात्री धडाकेबाज कारवाई केली. संवेदनशील परिसरात नियोजनबद्ध पद्धतीने टाकलेल्या या छाप्यात पोलिसांनी २२ जुगाऱ्यांना रंगेहाथ पकडले. या कारवाईत रोख रक्कम, १५ मोबाईल, जुगाराचे साहित्य व चारचाकी वाहन असा एकूण १७ लाख २६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस अधीक्षक रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. २५ सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांना मांडवा गावातील पारधी पेढी परिसरात मोठ्या प्रमाणावर तिरट जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. संबंधित ठिकाण संवेदनशील असल्याने कारवाईचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते.
माहितीची खातरजमा करून स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार, जलद प्रतिसाद पथक तसेच दंगा नियंत्रण पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचला. त्यानंतर अचानक जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला.
पोलिसांचा छापा पडताच जुगाऱ्यांमध्ये एकच धावपळ उडाली. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून पैशांची पैज लावत तिरट जुगार खेळणाऱ्या २२ जणांना ताब्यात घेतले.
कारवाईदरम्यान २ लाख ४६ हजार ६०० रुपयांची रोख रक्कम, १५ मोबाईल फोन, जुगाराचे साहित्य आणि एक चारचाकी वाहन असा एकूण १७ लाख २६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात आली आहे.
दोन आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवरील पाहिजे
या कारवाईत पकडण्यात आलेल्या संतोष रमेश काळे (रा. मांडवा) हा १४ चोरीच्या गुन्ह्यांमध्ये पाहिजे आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच अतुल कालीदास काळे (रा. कन्हेरवाडी पाटी) हा वाशी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यात पाहिजे आरोपी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहायक पोलीस निरीक्षक सचिन खटके, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, पुष्कर मुंगळे, दत्ता राठोड, दया गादेकर, अशोक ढगारे, योगेश कोळी, चापोह महेबुब अरब, चापोशि केदार तसेच आरसीपी व क्यूआरटी पथकातील अंमलदारांनी केली. एलसीबीच्या या धडाकेबाज कारवाईमुळे अवैध जुगार व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.