मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षणाला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ;नवमतदार नोंदणीसाठी श्री माधवराव पाटील महाविद्यालयात विशेष मोहीम

मुरूम, ता. उमरगा, दि. २७ सप्टेंबर :

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण-२०२६ मोहिमेला मुरूम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मंगळवार, २२ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या मोहिमेत नवमतदार नोंदणीसह पात्र नागरिकांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी मार्गदर्शन केले जात आहे.

महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच परिसरातील पात्र नागरिकांनी या संधीचा लाभ घेत मतदार यादीत आपले नाव नोंदवून घ्यावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार यांनी केले आहे.

नवीन मतदार नोंदणीसाठी पात्र तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी प्राचार्य डॉ. महेश्वर होगाडे, प्रा. डॉ. सतीश शेळके, प्रा. डॉ. विनायक रासुरे, प्रा. अक्षय हलसे, प्रा. लक्ष्मण पवार, डॉ. महेश मोटे, प्रा. डॉ. विलास खडके आदींनी पुढाकार घेतला आहे. नमुना ६ भरून नवीन मतदार म्हणून नोंदणी करण्याबाबत प्रा. डॉ. विलास खडके व डॉ. महेश मोटे यांच्याकडून सविस्तर मार्गदर्शन केले जात आहे.
१८ वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुणांना संधी
३१ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण करणारे पात्र भारतीय नागरिक नवीन मतदार म्हणून नोंदणी करू शकतात. अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक असून, त्याचे नाव अन्य कोणत्याही मतदारसंघातील मतदार यादीत आधीपासून समाविष्ट नसावे.

नवीन नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी नमुना ६ भरणे आवश्यक आहे. भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करता येतो. तसेच महाविद्यालयाशी संपर्क साधून नमुना ६ चा अर्ज घेऊन आवश्यक कागदपत्रांसह जमा करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ही कागदपत्रे आवश्यक नोंदणीसाठी जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा दहावीचे प्रमाणपत्र, तसेच पॅनकार्ड, पासपोर्ट, आधारकार्ड, बँक अथवा पोस्ट ऑफिस पासबुक यापैकी आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. पत्ता पुराव्यासाठी पाणीपट्टी, वीज बिल किंवा महसूल विभागाचे कागदपत्र आणि पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो आवश्यक आहे.
आगामी अंतिम मतदार यादीत पात्र नागरिकांचे नाव समाविष्ट होण्यासाठी १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या तसेच अद्याप मतदार म्हणून नोंदणी न झालेल्या नागरिकांनी विलंब न करता नमुना ६ भरून या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
 
Top