हुंड्याच्या छळाने आईने तीन लेकरांसह किल्ल्यावरून घेतली उडी! चौघांविरुद्ध गुन्हा दाखल 

अश्विनीसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू; एक जखमी; पती-सासऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

नळदुर्ग, दि. ४ सप्टेंबर : 

हुंड्यासाठी माहेरून सोन्याच्या पाटल्या आणि ऑटो रिक्षा घेण्यासाठी पैसे आणावेत, या मागणीसाठी होणाऱ्या कथित शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून राष्ट्रीय स्तरावर  स्पर्धा गाजवणाऱ्या महिला कुस्तीपटू
अश्विनी मनोहर पौळ हिने
  आपल्या तीन चिमुकल्या मुलांसह नळदुर्ग किल्ल्यातील उपरी बुरुजावरून शंभर फुटी खाली उडी मारल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी (दि. ३) दुपारी घडली. या घटनेत आईसह तिच्या दोन मुलांचा मृत्यू झाला, तर अडीच वर्षांची एक मुलगी जखमी झाली. या प्रकरणी पती, सासू, सासरे आणि आत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पती व सासऱ्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.


अश्विनी मनोहर पौळ (वय ३०), अजिंक्य मनोहर पौळ (वय ५) आणि क्रांती मनोहर पौळ (वय २.५) अशी मृतांची नावे आहेत. वीरा मनोहर पौळ (वय २.५) ही जखमी झाली आहे.
अश्विनीचे वडील तानाजी शिवाजी मोहिते (वय ५४, रा. व्हंताळ, ता. उमरगा) यांच्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलिस ठाण्यात मनोहर अंकुश पौळ, अंकुश पंढरीनाथ पौळ, कालींदा अंकुश पौळ आणि विमलाबाई यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ८०, १०८, ८५ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘माहेरून पाटल्या, ऑटो रिक्षेसाठी पैसे आण’
फिर्यादीत केलेल्या आरोपानुसार, अश्विनीला ‘तुला दोन जुळ्या मुली झाल्या आहेत. लग्नाच्या वेळी तुझ्या आई-वडिलांनी हुंड्यामध्ये काही दिलेले नाही,’ असे म्हणत माहेरून सोन्याच्या पाटल्या तसेच ऑटो रिक्षा घेण्यासाठी पैसे आणण्याची मागणी केली जात होती. या मागणीवरून तिला वारंवार मारहाण करून मानसिक व शारीरिक त्रास दिला जात असल्याचा आरोप आहे.

या छळाला कंटाळून अश्विनीने गुरुवारी दुपारी तीन वाजून ३० मिनिटांच्या सुमारास तीनही मुलांना सोबत घेत नळदुर्ग किल्ल्यातील बुरुजावर चढून खाली उडी मारल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

गुन्हा दाखल होताच पती-सासरे पोलिसांच्या ताब्यात
घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाल्यानंतर पती मनोहर पौळ व सासरे अंकुश पौळ यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अन्य आरोपींबाबतही पोलिसांकडून तपास सुरू आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी मनोहर पाटील, पोलिस निरीक्षक रविंद्र गायकवाड व पोलिस उपनिरीक्षक अख्तर सय्यद यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक रविंद्र गायकवाड करीत आहेत.

माहेरी एकाच सरणावर आईसह दोन चिमुकल्यांना अग्नी
दरम्यान, शुक्रवारी दुपारी अश्विनी व तिच्या दोन्ही मृत मुलांचे उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. सायंकाळी चार वाजता आई अश्विनी आणि तिच्या दोन चिमुकल्यांवर एकाच सरणावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच कुटुंबातील तिघांना एकाच वेळी अग्नी देण्याची हृदयद्रावक वेळ आल्याने व्हतांळ या.उमरगा परिसरावर शोककळा पसरली होती. अंत्यसंस्कारावेळी नातेवाईकांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.
 
Top