पाऊस गायब, शेतकरी हवालदिल; धाराशिवला दुष्काळ जाहीर करा!

पावसाच्या खंडाने खरीप पिके धोक्यात; एमआयएम जिल्हाध्यक्ष शहाबाज काझी यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

नळदुर्ग, दि. १५ सप्टेंबर :

पावसाच्या दीर्घ खंडामुळे धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम गंभीर संकटात सापडला असून अनेक भागांतील पिके वाळण्याच्या मार्गावर आहेत. शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाल्याने जिल्ह्यात तातडीने दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत व विविध शासकीय सवलती द्याव्यात, अशी मागणी एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शहाबाज काझी यांनी केली.


काझी यांनी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन जिल्ह्यातील पावसाची व शेतीची गंभीर परिस्थिती मांडली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन साद करण्यात आले.

यंदाच्या खरीप हंगामात पावसाने मोठ्या प्रमाणात खंड दिल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. अनेक ठिकाणी पिके सुकण्याच्या मार्गावर असून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. वाढता उत्पादन खर्च, आर्थिक अडचणी आणि पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकरी आर्थिक संकटाच्या विळख्यात सापडला आहे.

जिल्हा प्रशासनाने गावनिहाय व तालुकानिहाय परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करावेत. नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल शासनाकडे पाठवून पीकविमा व शासकीय नुकसानभरपाई तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

पावसाच्या खंडामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी. पशुधनासाठी चारा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. गरजेनुसार चारा छावण्या सुरू कराव्यात. पाणीटंचाई निर्माण झालेल्या गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेती कर्जाबाबत कर्ज पुनर्गठन, स्थगिती अथवा शासनाच्या नियमानुसार आवश्यक सवलती देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावा. आगामी हंगामासाठी दर्जेदार व सुरक्षित बियाणे उपलब्ध करून द्यावे. शेतीसाठी आवश्यक वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणी करण्यात आली.

गावनिहाय वस्तुनिष्ठ पाहणीची मागणी
जिल्ह्यातील प्रत्येक तालुका व गावनिहाय पावसाची नोंद, पिकांची स्थिती आणि नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करावी. केवळ कागदोपत्री अहवालावर अवलंबून न राहता शेताच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करून त्यानुसार तातडीच्या उपाययोजना कराव्यात, अशी भूमिका एमआयएमचे शहाबाज काझी यांनी मांडली.


पावसाच्या खंडामुळे खरीप हंगाम धोक्यात आलेल्या शेतकऱ्यांना शासनाने तातडीने दिलासा द्यावा. निवेदनातील मागण्यांवर त्वरित कार्यवाही करून त्याची माहिती देण्यात यावी, अशी मागणी शहाबाज काझी यांनी केली.
 
Top