गणेशोत्सवात खाकीचा धाक; नळदुर्ग शहरातून पोलिसांचा सशस्त्र रूट मार्च
८ अधिकारी, अंमलदार ३०, होमगार्ड ८० व एसआरपीएफची तुकडी सहभागी; समाजकंटकांना स्पष्ट इशारा
नळदुर्ग, दि. १५ सप्टेंबर :
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक नळदुर्ग शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नळदुर्ग पोलिसांनी मंगळवारी सकाळी शहरातून सशस्त्र रूट मार्च काढला. पोलिसांच्या दिमतीला असलेल्या मोठ्या फौजफाट्याच्या संचलनातून ‘उत्सव श्रद्धेने साजरा करा; मात्र कायदा हातात घेतल्यास खाकीची कारवाई अटळ’ असा स्पष्ट संदेश समाजकंटकांना देण्यात आला.
गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण आहे. या काळात शांतता भंग करण्याचा किंवा अनुचित प्रकार घडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराच रूट मार्चमधून देण्यात आला. नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, संवेदनशील ठिकाणी पोलिसांची उपस्थिती दाखविणे आणि संभाव्य अनुचित प्रकारांना प्रतिबंध करणे, हा रूट मार्चचा प्रमुख उद्देश होता.
मुख्य मिरवणूक मार्गांवर पोलिसांची करडी नजर
पोलिस ठाण्यापासून सुरू झालेला रूट मार्च ऐतिहासिक किल्ला गेट, कुरेशी गल्ली, हुतात्मा चौक, मुख्य रस्ता, बसस्थानक, महामार्ग, नानीमाँ रोड, चावडी चौक व मराठा गल्ली मार्गे पुन्हा पोलिस ठाण्यात येऊन समाप्त झाला. सकाळी ९.३५ वाजता सुरू झालेल्या या संचलनाने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले.
गणेशोत्सव काळात गर्दीची ठिकाणे, प्रमुख चौक तसेच गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर पोलिसांची विशेष नजर राहणार आहे. गणेश मंडळांनी ध्वनीक्षेपक, मिरवणूक, वाहतूक तसेच अन्य बाबींशी संबंधित नियमांचे पालन करावे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.
मोठ्या फौजफाट्यासह संचलन
या रूट मार्चमध्ये ८ अधिकारी, ३० पोलिस अंमलदार, होमगार्ड ८० तसेच राज्य राखीव पोलिस दलाची तुकडी सहभागी झाली होती. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नळदुर्ग पोलिस यंत्रणा बंदोबस्तासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे चित्र दिसून आले.
गणेशमूर्ती प्रतिष्ठापना, आरती, धार्मिक कार्यक्रम तसेच विसर्जन मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी आवश्यक नियोजन केले आहे. गर्दीची ठिकाणे व प्रमुख मिरवणूक मार्गांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
जळकोटमध्येही पोलिसांचे संचलन
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळकोट (ता. तुळजापूर) येथेही पोलिसांकडून गावातून रूट मार्च काढण्यात आला. त्यामुळे नळदुर्गसह परिसरातील गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज असल्याचा संदेश देण्यात आला.
धाराशिव जिल्हा पोलिस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलिस अधिकारी मनोहर पाटील यांच्या आदेशानुसार तसेच नळदुर्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र गायकवाड गोपनीय शाखेचे तुकाराम जांभळेसह इतर अधिकाऱ्यांच्या नियोजनातून हा रूट मार्च पार पडला.