गरोदर महिलेच्या खुनातील फरार दोघे कळंब पोलिसांच्या जाळ्यात ;धुळे जिल्ह्यातील निर्घृण हत्येप्रकरणी कारवाई; गुन्ह्यात वापरलेली कारही हस्तगत

धाराशिव, दि. २८ सप्टेंबर : 

धुळे जिल्ह्यातील नरवाळ परिसरात गरोदर महिलेचा निर्घृण खून करून मृतदेह जाळून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी फरार असलेल्या पुरुष व महिला आरोपीला कळंब पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. 

फारुख हजु शेख (वय २९, रा. सुर्डी, ता. केज, जि. बीड, ह.मु. शेरे गल्ली, कळंब) आणि रोहिणी स्वप्निल जाधव ऊर्फ माधुरी महेंद्र मेघे (वय २६, रा. जामखेड कला केंद्र, मूळ रा. छत्रपती संभाजीनगर) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.

 त्यांच्याकडून या गुन्ह्यात वापरलेली होंडा मोबिलिओ कारही पोलिसांनी हस्तगत केली.
२२ सप्टेंबर रोजी नरवाळ, ता. जि. धुळे येथील चाळीसगाव-धुळे महामार्गालगत मुरमा टेकड्यांच्या परिसरातील वनक्षेत्रात निर्जन ठिकाणी एका अनोळखी गरोदर महिलेचा मारहाण करून खून करण्यात आला होता. त्यानंतर तिचा मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेप्रकरणी मोहाडीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासादरम्यान मृत महिलेची ओळख नर्तिका पिंकी हनुमंत काटकर (वय ३१, रा. जामखेड कला केंद्र) अशी निष्पन्न झाली. या प्रकरणात सरफराज ऊर्फ शफीक अलीम मोमीन, आरीफ ऊर्फ खुज्या आसीफ शेख, लक्ष्मी बालाजी पवार, स्वाती ऊर्फ आरती गणेश कुहाडे यांना यापूर्वीच धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन मोहाडीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले होते. मात्र फारुख शेख व रोहिणी जाधव हे दोघे फरार होते.

हॉटेलसमोर दबा धरून कारवाई

फरार आरोपी कळंब येथून केज रोडकडे जेवणासाठी जाणार असल्याची खात्रीलायक माहिती पोलिस निरीक्षक शकील शेख यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी केज रोडवरील ७/१२ हॉटेलसमोर सापळा रचला. पोलिसांचे पथक अंधारात दबा धरून बसले असताना संशयित पुरुष व महिला तेथे आढळून आले.
चौकशी केल्यानंतर त्यांची नावे व गुन्ह्यातील सहभागाची खात्री करण्यात आली. त्यानंतर दोन्ही आरोपींना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ताब्यात घेण्यात आले. त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुढील कारवाईसाठी मोहाडीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

नंबर प्लेट काढलेली कार बेवारस अवस्थेत
दरम्यान, आरोपींनी गुन्ह्यात वापरल्याचा संशय असलेली पांढऱ्या रंगाची होंडा मोबिलिओ कार (क्रमांक MH 43 AR 4070) कळंब शहरात बेवारस अवस्थेत आढळून आली. कारची नंबर प्लेट काढण्यात आली होती. पोलिसांनी कार ताब्यात घेऊन तीही मोहाडीनगर पोलिसांच्या स्वाधीन केली.

ही कारवाई धाराशिव पोलिस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शकील शेख, सहायक पोलिस निरीक्षक समाधान बजबळकर, पोलिस हवालदार महादेव मुंडे, पोलिस हवालदार अजीज शेख आणि महिला पोलिस अंमलदार सपना गिते यांच्या पथकाने केली.


 
Top