शेतातील काम अडवून जातीवाचक शिवीगाळ; नळदुर्ग पोलिसात तिघांविरुद्ध ॲट्रॉसिटीसह गुन्हा

नळदुर्ग, दि. २८ सप्टेंबर : 
तुळजापूर तालुक्यातील अलियाबाद शिवारातील शेतात काम करीत असलेल्या अनुसूचित जातीतील शेतकऱ्याला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांविरुद्ध नळदुर्ग पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागनाथ भुजंगराव कांबळे (वय ५९, रा. अणदूर, ता. तुळजापूर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारास कांबळे हे अलियाबाद शिवारातील गट क्रमांक ६७ मधील त्यांच्या शेतात काम करीत होते. यावेळी अनिल  बेडगे, बंकट  बेडगे (दोघे रा. जळकोट) आणि तनविर अहमदहुसेन कुरेशी (रा. नळदुर्ग) यांनी संगनमत करून शेतातील काम अडविल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

आरोपींनी कांबळे यांना जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. तसेच शेतावर कब्जा करण्याच्या उद्देशाने हा प्रकार केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी नळदुर्ग पोलिसांनी २६ सप्टेंबर रोजी रात्री १०.४६ वाजता भारतीय न्याय संहितेतील कलम १२६(२), ११५(२), ३५२, ३(५) तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ मधील कलम ३(१)(r)(s), ३(२)(va) अन्वये गुन्हा दाखल केला.

गुन्ह्याचा पुढील तपास तुळजापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी मनोहर पाटील करीत आहेत. पोलिस निरीक्षक गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
 
Top