तायक्वांदोच्या रणांगणात धाराशिवच्या ३५ खेळाडूंची बाजी; विभागीय स्पर्धेसाठी निवड; निवासी उपजिल्हाधिकारी कडवकर यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव
धाराशिव, दि. १ ऑक्टोंबर :
तायक्वांदोच्या जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेत दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या ३५ खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या गुणवंत खेळाडूंचा श्री तुळजाभवानी क्रीडा संकुलावर आयोजित कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि धाराशिव जिल्हा तायक्वांदो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १४, १७ व १९ वर्षांखालील मुला-मुलींच्या जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत विजयी ठरलेल्या खेळाडूंनी आता विभागीय स्पर्धेचे तिकीट मिळविले आहे.
विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धा नांदेड येथे २ व ४ ऑक्टोबरदरम्यान होणार असून, या स्पर्धेत हे खेळाडू धाराशिव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात या कामगिरीकडे आश्वासक पाऊल म्हणून पाहिले जात आहे.
यावेळी यशदा उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष सुधीर सस्ते, जिल्हा क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे, जिल्हा तायक्वांदो संघटनेचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, सचिव तथा मुख्य प्रशिक्षक राजेश महाजन, अनिल बळवंत, शरीफ शेख आदी उपस्थित होते.
या खेळाडूंना राजेश महाजन, अनिल बळवंत, राम दराडे, स्मिता गायकवाड, माधव महाजन व पूजा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. विजेत्या खेळाडूंचे जिल्हा तायक्वांदो संघटनेचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, उपाध्यक्ष जी. बी. कासराळे, किरण वैद्य व सूर्यकांत वाघमारे, रवींद्र जाधव यांनी अभिनंदन केले.
विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेले खेळाडू
१४ वर्षे मुले : गणेश कडेकर, रणवीर सूर्यवंशी, रोहित गोरे, समर्थ साठे, ओम पाटील, वैभव गायकवाड, संग्राम लोमटे, सात्विक इंगळे, आदीब शेख, स्वराज ठाकर.
१४ वर्षे मुली : आरोही थोरात, सृष्टी गायकवाड, आराध्या सोनटक्के, अनुष्का कोरे, प्रणवी वायकर, प्रांजल भुतेकर, स्वरा कांबळे.
१७ वर्षे मुले : अर्णव ढेकणे, कार्तिक जटनुरे, प्रतीक शिंदे, अली मुलानी, स्वराज कांबळे, ऋत्विक ठाकर.
१७ वर्षे मुली : संस्कृती नलावडे, संस्कृती कपाळे, ज्ञानेश्वरी कुंभार, तन्वी कोरे, श्रुती अंबार, तेजस्विनी बांगर, मधुरा महाजन, स्वराली पडवळ, दिव्या कोने.
१९ वर्षे मुले : समर्थ मस्के, अविरत वराडे.
१९ वर्षे मुली : वैष्णवी साळुंखे, साक्षी डावकरे.
नांदेडच्या विभागीय स्पर्धेत धाराशिवचे हे खेळाडू आता पदकासाठी झुंजणार असून, त्यांच्या कामगिरीकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.