करजखेडा ते अमेरिका! कुणाल चव्हाणची जागतिक भरारी;  प्रतिष्ठित मॅसॅच्युसेट्स अॅमहर्स्ट विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी निवड; तुळजापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

नळदुर्ग, दि. २० ऑक्टोंबर : 

ग्रामीण भागाशी नाळ जोडलेल्या कुणाल सुनील चव्हाण याने आपल्या गुणवत्तेच्या बळावर थेट अमेरिकेत भरारी घेतली आहे. अमेरिकेतील प्रतिष्ठित मॅसॅच्युसेट्स अॅमहर्स्ट विद्यापीठात (UMass Amherst) एम.एस.ए.आय. (MSAI) या अभ्यासक्रमासाठी त्याची निवड झाली आहे. कुणालच्या या यशामुळे तुळजापूरसह त्याचे मूळ गाव करजखेडा परिसरात आनंदाचे वातावरण असून, त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कुणाल हा तुळजापूर येथील इंजिनीअर, कॉन्ट्रॅक्टर तथा बांधकाम व्यावसायिक सुनील व्यंकटराव चव्हाण यांचा मुलगा आहे. चव्हाण कुटुंबाचे मूळ गाव करजखेडा असून, सध्या ते तुळजापूर येथे वास्तव्यास आहेत.

कुणालने प्राथमिक शिक्षणानंतर लातूर येथे पुढील शिक्षण घेतले. त्यानंतर राजस्थानमधील कोटा येथे शिक्षण घेत अभियांत्रिकीच्या अभ्यासासाठी वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये (VIT) प्रवेश घेतला. सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द आणि शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर त्याने आता अमेरिकेतील विद्यापीठात उच्च शिक्षणाची संधी मिळवली आहे.

जागतिक स्तरावर संशोधन आणि उच्च शिक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या मॅसॅच्युसेट्स अॅमहर्स्ट विद्यापीठात प्रवेश मिळणे हा कुणालच्या शैक्षणिक वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. त्याच्या यशाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोरही जागतिक संधींचे नवे क्षितिज खुले असल्याचा संदेश दिला आहे.
कुणालच्या या उल्लेखनीय यशाबद्दल चव्हाण कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि तुळजापूर परिसरातील नागरिकांकडून त्याचे अभिनंदन केले जात आहे. त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त होत असून, करजखेड्याच्या मातीतून सुरू झालेला प्रवास अमेरिकेपर्यंत पोहोचल्याने तुळजापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top