येडोळ्यातील धम्मबांधव दीक्षाभूमीकडे रवाना; नळदुर्गच्या संविधान चौकातून नागपूरकडे प्रस्थान; ऐतिहासिक धम्मक्रांतीला अभिवादन करण्यासाठी उत्साह

नळदुर्ग, दि. १९  ऑक्टोंबर :एस. के. गायकवाड 

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक धम्मक्रांतीला अभिवादन करण्यासाठी तुळजापूर तालुक्यातील येडोळा येथील बौद्ध बांधव नागपूरच्या दीक्षाभूमीकडे रवाना झाले. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या ७० व्या वर्धापनदिनानिमित्त सिद्धार्थ कला व क्रीडा मंडळ तसेच सिद्धार्थ बुद्ध विहार मंडळाच्या सदस्यांनी या धम्मयात्रेचे आयोजन केले आहे.

सोमवारी (दि. १९) सकाळी साडे अकराच्या सुमारास नळदुर्ग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान चौकातून या बांधवांनी नागपूरकडे प्रस्थान केले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे येडोळा शाखाध्यक्ष देवानंद लोंढे, तुळजापूर तालुका संघटक सुरेश लोंढे, तालुका उपाध्यक्ष रामचंद्र लोंढे आणि ज्येष्ठ कार्यकर्ते दत्तात्रय काबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा दौरा आयोजित करण्यात आला आहे.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी अशोक विजयादशमीच्या दिवशी नागपूर येथील दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माचा स्वीकार केला. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो. यानिमित्त देशभरातून लाखो अनुयायी दीक्षाभूमीवर दाखल होऊन महामानवाला अभिवादन करतात.

दीक्षाभूमीला नतमस्तक होण्याचे समाधान
“धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या ७० व्या वर्धापनदिनानिमित्त ऐतिहासिक दीक्षाभूमीला नतमस्तक होण्याची संधी मिळत आहे, याचा मनस्वी आनंद आणि समाधान आहे,” अशा भावना प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी सहभागी बौद्ध उपासक-उपासिकांनी व्यक्त केल्या.
या धम्मयात्रेला रिपाइंचे  जिल्हा सचिव एस. के. गायकवाड  यांनी शुभेच्छा दिल्या.

या दौऱ्यात दत्तात्रय कांबळे, रामचंद्र लोंढे, सुरेश लोंढे, देवानंद लोंढे, अर्जुन लोंढे, जितेंद्र लोंढे, रतन लोंढे, स्वप्नील लोंढे, दीपक भांगे यांच्यासह धम्मभगिनी दीक्षा लोंढे, पायल लोंढे, रागिणी लोंढे, सुजाता लोंढे आणि काजल गायकवाड आदी सहभागी झाले आहेत.


Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top