दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी यशवंत नवरात्र मंडळाचे कुंकुमार्चन; देवीचरणी साकडे!
यशवंतनगरमध्ये विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

मुरूम, दि. १९ ऑक्टोंबर : 

 दुष्काळी संकट दूर होऊन शेतकरी बांधवांना दिलासा मिळावा, त्यांचे मनोबल उंचावावे आणि सर्वत्र सुख-समृद्धी नांदावी, या प्रार्थनेसह मुरूम येथील यशवंतनगर नवरात्र महिला मंडळाच्या वतीने कुंकुमार्चन विधी करण्यात आला. यशवंत नवरात्र महोत्सवात धार्मिक विधींसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्याच्या अनेक भागांत पावसाअभावी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, शेतीचे नुकसान आणि आर्थिक संकटामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर महिला मंडळाच्या वतीने देवीची आराधना करीत मराठवाड्यावरील संकट दूर व्हावे, शेतकऱ्यांना या परिस्थितीतून लवकर बाहेर पडण्याचे बळ मिळावे, अशी प्रार्थना करण्यात आली.

कुंकुमार्चन हा देवी उपासनेतील महत्त्वाचा धार्मिक विधी मानला जातो. देवीच्या नामस्मरणासह कुंकू अर्पण करून शक्ती, सौभाग्य आणि मांगल्याचे प्रतीक असलेल्या देवीची भक्तिभावाने पूजा करण्यात आली. या उपक्रमात प्रा. विजया बेलकेरी, सुरेखा घोडके, संगीता देशमाने, सविता गाडेकर, कविता जाधव, विजया पाटील, मीना टाचले, कौशल्या चव्हाण, अंबिका सुरवसे, पद्मा टाचले, शितल राजपूत, निर्मला बोंगरगे, कविता निलवाडे आणि सविता धर्माधिकारी यांच्यासह महिलांनी सहभाग घेतला.
महाआरती, महाप्रसाद अन् गरब्याची रंगत
महोत्सवात दररोज आराधी मंडळाकडून देवीची प्रार्थना, सकाळी व सायंकाळी महाआरती आणि भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत आहे. महिलांसाठी गरबा कार्यक्रमही आयोजित केला आहे. अजिंक्य राठोड यांनी साकारलेली तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेची भव्य रांगोळी भाविकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. देवीला साडी-चोळी अर्पण करून ओटी भरण्याचा धार्मिक विधीही भक्तिभावाने पार पडत असून, त्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात येते.

मंडळाचा उत्स्फूर्त सहभाग
नवरात्र महोत्सव यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष विजयसिंह चव्हाण, उपाध्यक्ष दिनेश कोरे यांच्यासह तेजस निलवाडे, श्रीधर निलवाडे, संजय सुरवसे, गौरीशंकर बोंगरगे, चेतन कंटे, धनपाल चव्हाण, शुभम चव्हाण, अनिकेत पाटील, नीरज पडलवार, निशांत पडलवार, मानव चव्हाण, सोमनाथ जाधव, ओंकार सुरवसे, प्रितेश राठोड, श्रेयश चव्हाण, उदय घैसास, सतीश कुंभार आणि विशाल कुंभार परिश्रम घेत आहेत. यशवंतनगरमधील महिला व भाविकांचा महोत्सवात मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे.


 
Top