भवानी तलवार अलंकार महापूजेसाठी तुळजापुरात भाविकांची मांदियाळी
‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला; स्वराज्याच्या ऐतिहासिक स्मृतींना उजाळा
तुळजापूर, दि. १८ ऑक्टोंबर:
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवात रविवार दि.१८ ऑक्टोंबर रोजी सप्तमीच्या दिवशी भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या परंपरेशी जोडल्या गेलेल्या या महापूजेच्या दर्शनासाठी मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने तुळजापूर नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली.
छत्रपती शिवाजी महाराज आणि तुळजाभवानी मातेचे नाते महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेत विशेष स्थान राखून आहे. लोकमान्यतेनुसार, स्वराज्य स्थापनेसाठी देवीने महाराजांना भवानी तलवार प्रदान केली होती. त्यामुळे ही तलवार शौर्य, सामर्थ्य आणि स्वराज्याच्या प्रेरणेचे प्रतीक मानली जाते. याच श्रद्धेचे प्रतिबिंब नवरात्रोत्सवातील भवानी तलवार अलंकार महापूजेतून उमटते.
देवीच्या विविध अलंकार महापूजांचे दर्शन घेण्यासाठी नवरात्रात भाविकांची गर्दी होत असली, तरी भवानी तलवार अलंकार महापूजेला ऐतिहासिक संदर्भांमुळे विशेष महत्त्व आहे. देवीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची वर्दळ सुरू होती. मंदिर परिसरात धार्मिक उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळाले.
मोर वाहनातून छबिना मिरवणूक
दरम्यान, शनिवारी रात्री श्री तुळजाभवानी मातेची छबिना मिरवणूक मोर वाहनातून काढण्यात आली. नवरात्रोत्सवातील पारंपरिक धार्मिक विधींमध्ये सहभागी होण्यासाठी आणि देवीच्या छबिन्याचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. विविध अलंकार महापूजा आणि छबिना मिरवणुकांमुळे तुळजापूरमधील नवरात्रोत्सवाचा उत्साह दिवसेंदिवस वाढत आहे.