जलसंवर्धन स्पर्धेत विजयसिंहराजे विद्यालयाची यशाची हॅट्ट्रिक!
निबंधात अधिरा गवळी द्वितीय; चित्रकलेत कृष्णाली गडकर प्रथम, तर शाहिद सय्यद तृतीय
धाराशिव, दि. २७ :
जलसंवर्धन आणि पाणी बचतीचा संदेश देणाऱ्या केंद्रस्तरीय निबंध व चित्रकला स्पर्धेत रामनगर येथील श्री सिद्धिविनायक सोशल फाउंडेशन संचलित विजयसिंहराजे प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळविले. तीन विद्यार्थ्यांनी विविध गटांत यश संपादन करीत शाळेचा नावलौकिक वाढविला.
‘मी आज असे पाणी वाचविले’ या विषयावर आयोजित स्पर्धेत अधिरा पांडुरंग गवळी हिने इयत्ता पहिली ते पाचवी गटातील निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला. याच गटातील चित्रकला स्पर्धेत सय्यद शाहिद हसन याने तृतीय क्रमांक मिळविला, तर इयत्ता सहावी ते आठवी गटातील चित्रकला स्पर्धेत कृष्णाली सुभाष गडकर हिने प्रथम क्रमांक मिळवून यशाची मोहोर उमटविली.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल श्री सिद्धिविनायक सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष, शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकवृंद यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
पाणी बचत, जलसंवर्धन आणि पर्यावरण रक्षणाविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरतात. विद्यार्थ्यांनी मिळविलेले हे यश शाळेतील शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांना प्रोत्साहन देणारे असून, भविष्यातही विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन शाळेचा गौरव वाढवावा, अशा शुभेच्छा यावेळी व्यक्त करण्यात आल्या.