हिवाळी अधिवेशन रद्द करा; निधी शेतकऱ्यांसाठी वापरा, शेतकरी संघर्ष समितीची राज्यपालांकडे मागणी; अनावश्यक खर्चात कपात करण्याचीही सूचना
नळदुर्ग, दि. २६ ऑक्टोंबर :
राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात असताना नागपूर येथे होणारे सन २०२६-२७ चे हिवाळी विधिमंडळ अधिवेशन रद्द करून त्यावरील खर्च दुष्काळग्रस्त शेतकरी व गरजू कुटुंबांच्या मदतीसाठी वापरावा, अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीने राज्यपालांकडे ई-मेलद्वारे केली आहे. अधिवेशन रद्द करणे शक्य नसल्यास अनावश्यक खर्चात कपात करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.
समितीचे समन्वयक दिलीप जोशी, धाराशिव जिल्हाध्यक्ष सरदारसिंग ठाकूर आणि तुळजापूर तालुकाध्यक्ष व्यंकट पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन पाठविण्यात आले.
शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज
अनियमित पाऊस, अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तींमुळे शेतीचे नुकसान होत आहे. वाढता उत्पादन खर्च, शेतीमालाला अपुरा भाव, कर्जाचा बोजा, चारा आणि पाणीटंचाई यांमुळे शेतकरी अडचणीत आहेत. शेतमजूर, कामगार, विद्यार्थी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांनाही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याचे समितीने नमूद केले.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्यावी, कर्जमाफीबाबत ठोस निर्णय घ्यावा, प्रलंबित अनुदान वितरित करावे, तसेच दुष्काळी भागांत चारा-पाण्याची व्यवस्था करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सार्वजनिक निधीच्या वापरावर प्रश्न
नागपूर अधिवेशनासाठी प्रवास, निवास, सुरक्षा आणि प्रशासकीय व्यवस्थेवर मोठा सार्वजनिक खर्च होतो. संकटग्रस्त नागरिकांच्या गरजांना प्राधान्य देऊन हा खर्च कमी करावा आणि उपलब्ध निधी दुष्काळ निवारणासाठी वळवावा, अशी भूमिका समितीने मांडली आहे.
अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांवर चर्चा होऊनही अनेक समस्या प्रलंबित राहतात, अशी भावना निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे अधिवेशन रद्द करण्याबाबत शासनाने विचार करावा; अन्यथा खर्चात कपात करून शेतकरी, शेतमजूर आणि गरजू कुटुंबांना मदत करावी, अशी मागणी आहे.
खर्चाचा तपशील जाहीर करण्याची मागणी
अधिवेशनावरील खर्च, केलेली कपात आणि दुष्काळ निवारणासाठी वापरलेल्या निधीचा तपशील जनतेसमोर पारदर्शकपणे जाहीर करावा. राज्यपालांनी निवेदनाची दखल घेऊन संबंधित शासन विभागांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश द्यावेत, अशी विनंतीही समितीने केली आहे.
या उपक्रमात जिल्हा उपाध्यक्ष महादेव बिराजदार व पंडित पाटील, जिल्हा सचिव अशोक पडोळे, प्रसिद्धीप्रमुख संतोष फडतरे, कोषाध्यक्ष गुलाब शिंदे यांच्यासह बालाजी ठाकूर, लक्ष्मण निकम, नानासाहेब पाटील, खंडू हलकंबे, रहेमान शेख आणि अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.