दुष्काळग्रस्तांना भरीव अनुदानासाठी केंद्र-राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार! ना. रामदास आठवले; मराठवाड्यातील दुष्काळावर नदीजोड प्रकल्प हाच दीर्घकालीन उपाय

नळदुर्ग, दि. १७ : एस.के. गायकवाड 

मराठवाड्यातील भीषण दुष्काळामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून, पावसाअभावी रब्बी हंगामही धोक्यात आला आहे. शेतकरी, शेतमजूर आणि पशुधनावरील संकट लक्षात घेता दुष्काळग्रस्तांना जास्तीत जास्त सहानुग्रह अनुदान मिळवून देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून पाठपुरावा करणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी सांगितले.

धाराशिव येथे १७ ऑक्टोबर रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, धाराशिव जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित कोरडा दुष्काळ परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. दुष्काळाच्या पाहणीसाठी आठवले १६ व १७ ऑक्टोबर रोजी मराठवाडा दौऱ्यावर आले होते.

आठवले म्हणाले, मराठवाड्यात पर्जन्यमान अत्यल्प झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. खरीप हंगाम हातचा गेला असून, रब्बी पिकांचीही आशा धूसर झाली आहे. जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, भूमिहीन शेतमजुरांच्या हाताला काम मिळत नसल्याने त्यांच्या कुटुंबांवरही उपासमारीचे संकट ओढवले आहे. अशा परिस्थितीत रोजगार हमीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून शेतमजुरांना रोजगार आणि आर्थिक आधार देण्यासाठी शासनाकडे मागणी करण्यात येईल.
नदीजोड प्रकल्पाची गरज
भविष्यात दुष्काळाची तीव्रता कमी करायची असेल, तर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील नदीजोड प्रकल्प देशभर राबविणे काळाची गरज आहे, असे आठवले यांनी नमूद केले. सरकारी मदतीबरोबरच सामाजिक दायित्वातूनही दुष्काळग्रस्तांना आधार मिळायला हवा. राजकीय पक्ष, सेवाभावी संस्था, संघटना तसेच अनिल अंबानी, मुकेश अंबानी आणि किर्लोस्कर यांसारख्या उद्योगसमूहांनीही दुष्काळग्रस्त शेतकरी व शेतमजुरांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
मतदार यादीतील त्रुटींची शहानिशा आवश्यक
मतचोरीच्या आरोपांवरून सुरू असलेल्या आंदोलनाबाबत विचारले असता, संविधानाने नागरिकांना न्याय्य प्रश्नांसाठी आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे, असे आठवले म्हणाले. 

सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग यांनी स्वतंत्र व स्वायत्त संस्थांप्रमाणे निष्पक्ष आणि पारदर्शकपणे काम करणे अपेक्षित आहे. मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण प्रक्रियेत मृत व्यक्तींची, एकापेक्षा अधिक ठिकाणी नावे असलेल्या तसेच मतदान न केलेल्या काही मतदारांची नावे वगळण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, प्रक्रियेत एखाद्या पात्र मतदाराचे नाव चुकून वगळले गेले असल्यास ते पुन्हा समाविष्ट करण्याची प्रक्रियाही सुरू असल्याने सर्व बाबींची शहानिशा होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अटकेचे समर्थन नाही; परिस्थितीचे गांभीर्य पाहावे
अभिजीत दीपके, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या अटकेसंदर्भातील प्रश्नावर बोलताना आठवले म्हणाले, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी काही वेळा पोलिस प्रशासनाला निर्णय घ्यावे लागतात. दलित पँथर आणि रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून आपणही अनेक आंदोलने केली असून, त्यावेळी अटकेलाही सामोरे जावे लागले आहे. संबंधित अटकेचे आपण समर्थन करत नसून, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने हा निर्णय घेतला असावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.

या परिषदेला रिपाइंचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, प्रदेश संयुक्त सचिव राजाभाऊ ओव्हाळ, प्रदेश सचिव संजय बनसोडे, जिल्हाध्यक्ष विद्यानंद बनसोडे, मराठवाडा विभाग उपाध्यक्ष भागवत शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top