उमरग्यात १६ लाखांचा गुटखा जप्त; दोघे ताब्यात
तलमोड चेकपोस्टवर पहाटे पोलिसांची नाकाबंदी; ९.०७ लाखांचा गुटखा, सात लाखांची इनोव्हा कार जप्त
उमरगा, दि. १७ ऑक्टोंबर :
तेलंगणातून महाराष्ट्रात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या इनोव्हा कारवर उमरगा पोलिसांनी धडक कारवाई केली. तलमोड चेकपोस्टवर केलेल्या नाकाबंदीत ‘हाय’ कंपनीच्या गुटख्याचे २४ गोण्यांमधील १ हजार २९६ पुडे जप्त करण्यात आले. गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरलेली इनोव्हा कार असा एकूण १६ लाख ७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी तेलंगणातील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. १६) पहाटे पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांना हैदराबादहून इनोव्हा कारमधून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पहाटे तीन वाजल्यापासून तलमोड चेकपोस्टवर नाकाबंदी करण्यात आली. सकाळी पाचच्या सुमारास बसवकल्याणकडून येणारी इनोव्हा कार (क्र.ए पी २३ एल २४७८ ) पोलिसांनी अडवून तपासणी केली.
कारच्या मागील सीटवर पांढऱ्या गोण्यांमध्ये भरलेला माल आढळला. त्याबाबत चालक मोहम्मद जमील मोहम्मद अहमद खान (वय ३२) आणि त्याचा साथीदार अली खान (वय २७, दोघेही रा. तेलंगणा) यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे पोलिसांनी गोण्या उघडून तपासणी केली असता त्यामध्ये ‘हाय’ कंपनीचा गुटखा आढळून आला.
यानंतर कारसह मुद्देमाल उमरगा पोलीस ठाण्यात आणण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाला माहिती देण्यात आल्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी पल्लवी इंबडे यांनी घटनास्थळी पंचनामा करून कारवाई केली. जप्त केलेल्या गुटख्याची किंमत ९ लाख ७ हजार २०० रुपये, तर इनोव्हा कारची अंदाजे किंमत सात लाख रुपये आहे.
या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी पल्लवी इंबडे यांच्या फिर्यादीवरून उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६७५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेतील कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी करीत आहेत.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
पोलीस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक रामहरी चाटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवलिंग घोळसगाव, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण नळेगावकर, भागवत घाटे तसेच होमगार्ड पुजारी, पवार, राठोड आणि चौधरी यांच्या पथकाने ही कारवाई केली.