देवसिंगा नळ येथे मोफत आरोग्य शिबिर; ११० रुग्णांची तपासणी; रक्तदाब, मधुमेहासह विविध आजारांची तपासणी; गरजू रुग्णांना औषधांचे वाटप
नळदुर्ग, दि. १७ ऑक्टोंबर :
देवसिंगा नळ (ता. तुळजापूर) येथे १६ ऑक्टोबर रोजी आयोजित मोफत आरोग्य शिबिराला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. या शिबिरात एकूण ११० गरजू रुग्णांची आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक औषधे व गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले.
ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यसेवा सहज उपलब्ध व्हावी आणि विविध आजारांचे वेळीच निदान व्हावे, या उद्देशाने हॅलो मेडिकल फाउंडेशन अणदुर यांच्या माध्यमातून हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिरात रुग्णांचे वजन व उंची मोजण्यासह रक्तदाब, मधुमेह आणि इतर आरोग्यविषयक तपासण्या करण्यात आल्या. तपासणीनंतर गरजेनुसार रुग्णांना औषधे देण्यात आली.
संस्थेच्या अध्यक्ष डॉ. शुभांगी अहंकारी, विश्वस्त डॉ. क्रांती रायमाने आणि शिबिर व्यवस्थापन प्रमुख बसवराज नरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. सुमित तोडकरी, कविता राठोड, लक्ष्मी दुपारगुडे, पल्लवी साबळे यांनी आरोग्य तपासणी व रुग्णसेवेत सहभाग घेतला.
तसेच मनमित्र विजया घोडके, समुपदेशक विनीत जाधव आणि पर्यवेक्षक सतीश चव्हाण यांनी शिबिराच्या कामकाजात सहकार्य केले. देवसिंगा नळचे सरपंच युवराज पाटील यांनीही शिबिर यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना एकाच ठिकाणी विविध आरोग्य तपासण्या व औषधोपचारांची सुविधा मिळाल्याने या उपक्रमाचा रुग्णांना लाभ झाला.