तुळजापूर जाणाऱ्या जलवाहिनी वाॅलव्ह मधुन बेसुमार शेतीसाठी पाणी उपसा?
बोरी धरणातील पाण्याच्या कथित चोरीची चौकशी करा; सकल हिंदू समाजाची पालकमंत्र्यांकडे मागणी
नळदुर्ग, दि. १६ ऑक्टोंबर :
मानेवाडी पाटीच्या आलीकडे ,तिर्थक्षेत्र तुळजापूर शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी नळदुर्ग येथिल बोरी धरणातून गेलेल्या मुख्य जलवाहिनी वाॅलव्हचे नट बोल्ट ढिले करुन शेतीसाठी पाणी उपसा केला जात असल्याचा आरोप सकल हिंदू समाजाने केला आहे. मानेवाडी शिवारातील संबंधित ठिकाणाची प्रत्यक्ष पाहणी करून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अनधिकृत पाणी उपसा आढळल्यास तो तातडीने बंद करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे दि.१५ ऑक्टोंबर रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
अपर तहसीलदार प्रमोद गायकवाड यांना निवेदन देताना सकल हिंदु समाजाचे रवी सुरवसे, गणेश मोरडे, विजय ठाकुर
सकल हिंदू समाजाने जिल्हाधिकाऱ्यां मार्फत दिलेल्या निवेदनानुसार, तुळजापूरकडे जाणाऱ्या रस्त्यालगत खंडू गोवे यांच्या शेताच्या परिसरात हा प्रकार घडत असल्याचा आरोप आहे. संबंधित शेतात मोठ्या प्रमाणावर ऊस पीक घेतले जात असून, मुख्य जलवाहिनीतुन पाणी शेतातील विहिरीत साठविले जात असल्याचे नमुद करुन सौर ऊर्जेच्या साहाय्याने पाणी उपसा करून शेतीसाठी वापर केला जात असल्याचेही म्हटले आहे.
पाणीटंचाईच्या काळात प्रकार गंभीर
धाराशिव जिल्ह्यात घटत्या जलसाठ्यामुळे आगामी काळात पाणी टंचाईची चिंता वाढली आहे. अशा परिस्थितीत पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असलेल्या जलवाहिनीतून अनधिकृत पाणी उपसा होत असल्याची बाब गंभीर असुन त्याचा परिणाम शहराच्या पाणी पुरवठ्यावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची केवळ कागदोपत्री चौकशी न करता प्रत्यक्ष स्थळ पाहणी आणि तांत्रिक तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
मुख्य जलवाहिनीला अनधिकृत जोडणी आहे का, पाणी किती काळापासून आणि किती प्रमाणात घेतले जात आहे, याची तपासणी करून वस्तुनिष्ठ अहवाल तयार करावा. अनधिकृत पाणी उपसा आढळल्यास जोडणी तातडीने बंद करावे तसेच संबंधित व्यक्तींवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. या प्रकाराकडे दुर्लक्ष किंवा कर्तव्यात कसूर झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही जबाबदारी निश्चित करावी, असेही नमूद करण्यात आले आहे.
नगरपरिषदेने तुळजापूरच्या मुख्य जलवाहिनीची नियमित तपासणी करण्यासाठी विशेष पथक नियुक्त करावे, भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कायमस्वरूपी उपाय योजना कराव्यात आणि केलेल्या कार्यवाहीची माहिती लेखी स्वरूपात द्यावी, अशी मागणी सकल हिंदू समाजाने केली आहे.
“बोरी धरणातून तुळजापूरला पाणीपुरवठा होत असून, मुख्य जलवाहिनीची देखरेख करण्याची जबाबदारी तुळजापूर नगरपरिषदेची आहे. या प्रकरणी नगरपरिषदेस पत्र देण्यात येईल. तसेच पाटबंधारे विभागाच्या वतीने संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती तपासण्यात येईल.”
महेश वाघमोडे, सहाय्यक अभियंता, पाटबंधारे विभाग, नळदुर्ग