कबड्डीच्या मैदानात ३९ संघांची झुंज!
जळकोटच्या कुलस्वामिनी आश्रमशाळेत तालुकास्तरीय स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; पोलिस निरीक्षक गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन

नळदुर्ग, दि. ६ ऑक्टोंबर : 

चढाई... पकड... आणि गुणांसाठी रंगलेली थरारक झुंज! जळकोट येथील कुलस्वामिनी आश्रमशाळेचे मैदान कबड्डीच्या डावपेचांनी आणि खेळाडूंच्या जोशाने दुमदुमून गेले. तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत तब्बल ३९ संघांनी सहभाग नोंदविल्याने स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय तथा धाराशिव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन नळदुर्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्या हस्ते झाले.
स्पर्धेत १४ वर्षे वयोगटातील १७, १७ वर्षे वयोगटातील १६ आणि १९ वर्षे वयोगटातील ६ संघ, असे एकूण ३९ संघ सहभागी झाले आहेत.
यावेळी मार्गदर्शन करताना गायकवाड म्हणाले, “जिद्द आणि चिकाटी ठेवली तर यश निश्चित मिळते. खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, शिस्त आणि संघभावना निर्माण होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.”

यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोक पाटील, माजी सरपंच गजेंद्र पाटील, तालुका क्रीडा अधिकारी गणेश पवार, प्रयाग मल्टीस्टेट बँकेचे अध्यक्ष सचिन कदम, डॉ. संजय कदम, प्राचार्य संतोष चव्हाण, मुख्याध्यापक विनायक राठोड, मुख्याध्यापक ए. जी. पवार, माजी सरपंच ज्योतिका चव्हाण, पंडित कदम आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश कोकाटे यांनी केले. आभार किरण कांबळे यांनी मानले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी नागेंद्र गुरव, देवानंद पांढरे, बिळेणसिद्ध हक्के, दुर्गेश कदम, किरण ढोले, साबळे सर, राठोड सर, मुखम सर, एस. एन. दुधभाते, के. बी. कारले, के. बी. लवंद, पी. एस. कुंचगे, अमित खारे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
 
Top