भजन-कीर्तनातून वारकरी सेवा करणाऱ्या युवा मृदंगाचार्याचा सर्पदंशाने अंत; अवघ्या २२व्या वर्षी काळाचा घाला; वागदरीवर शोककळा
नळदुर्ग, दि. ६ ऑक्टोंबर : एस.के.गायकवाड
भजन-कीर्तनाच्या माध्यमातून वारकरी सांप्रदायिक चळवळीची सेवा करणारे वागदरी (ता. तुळजापूर) येथील युवा वारकरी, मृदंगाचार्य व अभंग गायक रुपेश नागनाथ चव्हाण ऊर्फ लखन (बंटी) यांचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी (दि. ६) दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. अवघ्या २२व्या वर्षी त्यांच्या अकाली निधनाने वारकरी सांप्रदायावर शोककळा पसरली आहे.
रुपेश चव्हाण यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर शेती व्यवसायात वडिलांना हातभार लावत वारकरी संप्रदायाच्या सेवेत स्वतःला झोकून दिले होते. उत्कृष्ट मृदंगवादक आणि अभंग गायक म्हणून अल्पावधीतच त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. सोमवारी (दि. ५) रात्री अक्कलकोट तालुक्यातील किणी येथे आयोजित भजन-कीर्तनाच्या कार्यक्रमात त्यांनी सेवा बजावली होती.
मंगळवारी दुपारी वागदरी शिवारातील शेतात झाडाखाली विश्रांती घेत असताना विषारी नागाने त्यांना दंश केला. त्यांना तातडीने उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
लखन यांच्या अकाली निधनाने वारकरी सांप्रदायिक चळवळीतील एक उमलते युवा नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, आजी व एक भाऊ असा परिवार आहे.
अंत्यसंस्कार आज
रुपेश चव्हाण यांच्या पार्थिवावर बुधवार (दि. ७) सकाळी १०.३० वाजता वागदरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.