शॉर्टसर्किटने सौंदना आंब्यात २५ एकर ऊस जळून खाक! १५ अल्पभूधारक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; दुष्काळात जगविलेले पीक आगीच्या भक्ष्यस्थानी
कळंब, दि. २७ ऑक्टोबर :
तालुक्यातील सौंदना (आंबा) येथे शेतातून गेलेल्या वीजवाहक तारांमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने लागलेल्या आगीत तब्बल २५ एकरांवरील ऊस जळून खाक झाला. सोमवार, दि. २६ ऑक्टोबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास घडलेल्या या घटनेत १५ अल्पभूधारक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. आधीच दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
शेतातून गेलेल्या वीजवाहक तारांमधील शॉर्टसर्किटमुळे उसाच्या फडाला आग लागल्याचे समजते. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. आगीची तीव्रता एवढी होती की, ती आटोक्यात आणण्यासाठी शेतकरी आणि तरुणांची मोठी दमछाक झाली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेकडो तरुण मदतीसाठी धावले. झाडांच्या फांद्या व पाला यांच्या साहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही शेतांमध्ये ऊसतोडी नंतरचे पाचट शिल्लक असल्याने आग वेगाने पसरत होती. त्यामुळे ट्रॅक्टरच्या साहाय्याने आगीचा फैलाव रोखण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, आगीने मोठ्या क्षेत्राला कवेत घेतल्याने २५ एकरांवरील ऊस जळून खाक झाला.
दुष्काळात जगविलेले पीकही हिरावले
यंदा पावसाने ओढ दिल्याने परिसरातील शेतकरी आधीच अडचणीत आहेत. उपलब्ध पाण्यावर मोठ्या कष्टाने जोपासलेले उसाचे पीक या आगीत नष्ट झाले. अनेक शेतकऱ्यांसाठी ऊस हेच उत्पन्नाचे प्रमुख साधन होते. त्यामुळे नुकसान भरून कसे काढायचे, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.
जळीत उसाच्या वजनात होणारी कपात आणि अपेक्षित उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांच्या हातात प्रत्यक्ष किती रक्कम उरणार, याचीही चिंता आहे. कष्टाने वाढविलेले पीक डोळ्यांदेखत जळताना पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
शॉर्टसर्किटमुळे ऊस जळण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. प्रत्येक वेळी पंचनामे व पाहणी करून अहवाल सादर केला जातो; मात्र सौंदना आंबा व परिसरातील जळीत उसासाठी शेतकऱ्यांना महावितरणकडून अद्याप एक रुपयाही मिळाला नसल्याचा दावा युवासेनेचे धाराशिव उपजिल्हाप्रमुख संदीप पालकर यांनी केला.
या गंभीर घटनेची लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी व तहसीलदार यांनी दखल घेऊन बाधित शेतकऱ्यांना विशेष निधीतून आर्थिक मदत मिळवून द्यावी. तसेच दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन जळीत उसावरील २५ टक्के दरकपातीचा निर्णय स्थगित करावा, अशी मागणी पालकर यांनी केली आहे.
नुकसानग्रस्त शेतकरी
ऋषीकेश धनराज पालकर, माणिक धोंडिबा पालकर, श्रीमंत विनायक पालकर, नवनाथ मोकिंदा पालकर, अंबादास रामा गिरी, दत्ता लिंबराज गिरी, बापू लाला गिरी, प्रभावती खंडू पालकर, निलावती मुरलीधर मोरे, आशाबाई शेषेराव डिगे, अनंत भागवत डिगे, मुरलीधर मोकिंदा गाडेकर, दत्ता केशव गाडेकर, तुकाराम अंबादास गाडेकर आणि महादेव अंबादास गाडेकर आदी.