आंबेडकरी चळवळीतील युवा चेहरा काळाच्या पडद्याआड; सिद्धांत बनसोडे यांना अखेरचा निरोप; हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन; नळदुर्गमध्ये बौद्ध धम्मपद्धतीने अंत्यसंस्कार, मान्यवरांकडून श्रद्धांजली

नळदुर्ग, दि. ९  ऑक्टोंबर :
आंबेडकरी चळवळीशी नाळ जोडून सामाजिक क्षेत्रात वावरणारे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब दुष्यंत बनसोडे यांचे ज्येष्ठ चिरंजीव सिद्धांत बाबासाहेब बनसोडे उर्फ सोनू यांचे गुरुवारी (दि. ८) रात्री दहा वाजता हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने बनसोडे कुटुंबीयांसह नळदुर्ग शहर आणि परिसरातील युवकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
युवकांचा आधार हरपला
सोनू हे नळदुर्ग आणि परिसरातील युवकांमध्ये परिचित होते. आंबेडकरी चळवळीतील युवा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांच्या जाण्याने चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली असून, युवकांचा एक आधार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. नळदुर्ग येथील बौद्धाचार्य दादासाहेब बनसोडे यांचे ते पुतणे होत.
त्यांच्या अकाली एक्झिटने कुटुंबीय, मित्रपरिवार आणि चळवळीतील सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे कठीण असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
बौद्ध धम्मपद्धतीने अंत्यसंस्कार
शुक्रवारी (दि. ९ ऑक्टोबर) दुपारी एक वाजता नळदुर्ग येथे बौद्ध धम्मपद्धतीने सिद्धांत बनसोडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे महाराष्ट्र प्रदेश जॉइंट सेक्रेटरी राजाभाऊ ओव्हाळ, जिल्हाध्यक्ष विद्यानंद बनसोडे, जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मस्के, भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हाध्यक्षा राजश्रीताई कदम यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, युवा कार्यकर्ते आणि महिलांनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली.
सिद्धांत बनसोडे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन चुलते, चुलत्या, भावंडे आणि आत्या असा परिवार आहे.


 
Top