महादेव मंदिराच्या पाच लाखांच्या देणगीचा वाद पेटला! जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव; १२ ऑक्टोबरपासून पोलीसठाण्या समोर उपोषणाचा इशारा
नळदुर्ग, दि. ९ ऑक्टोंबर :
वागदरी (ता.तुळजापूर ) येथील महादेव मंदिरासाठी ब्ल्यू पॉईन एनर्जी प्रा. लि. कंपनीकडून देण्यात आलेल्या पाच लाख रुपयांच्या देणगीच्या कथित अपहार प्रकरणी वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी तक्रार देऊनही नळदुर्ग पोलिसांकडून ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप करत, संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून कायद्यानुसार कार्यवाही करावी, अन्यथा १२ ऑक्टोबरपासून नळदुर्ग पोलीस ठाण्यासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या प्रकरणासंदर्भात जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांची माजी सरपंच राजेंद्र पवार, भजनी मंडळाचे अध्यक्ष राम यादव, संजय काकडे, तंटामुक्ती उपाध्यक्ष मदन पाटील, माजी उपसरपंच दत्ता सुरवसे, ग्रामपंचायत सदस्य अमोल पवार, दीपक धुमाळ, प्रमोद बिराजदार, अमोल पाटील आदींनी भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी संबंधित प्रकरणावर चर्चा करण्यात आली, अशी माहिती अमोल पाटील यांनी दिली.
महादेव मंदिराच्या कामासाठी ब्ल्यू पॉईन एनर्जी प्रा. लि. कंपनीकडून पाच लाख रुपयांची देणगी देण्यात आली होती. मात्र, ही रक्कम मंदिराच्या कामासाठी वापरण्या ऐवजी संबंधिताने स्वतःकडे ठेवून हडप केल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.
यासंदर्भात २१ सप्टेंबर २०२६ रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देण्यात आली असून, त्यासोबत संबंधित कागदपत्रे व आवश्यक माहितीही सादर केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तक्रार दाखल करून सुमारे १५ दिवस उलटूनही ठोस कार्यवाही झालेली नाही. तसेच तक्रारीची सद्यस्थिती आणि त्यावर करण्यात आलेल्या कार्यवाहीबाबत लेखी माहिती देण्यात आलेली नसल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
गृहमंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन
या प्रकरणाची दखल घेऊन तातडीने योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, या मागणीचे निवेदन राज्याचे गृहमंत्री, धाराशिवचे पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनाही माहितीस्तव पाठविण्यात आले आहे.
पोलिसांनी तातडीने कारवाई न केल्यास १२ ऑक्टोबरपासून नळदुर्ग पोलीस ठाण्यासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्याचा निर्धार निवेदनकर्त्यांनी व्यक्त केला आहे. हे उपोषण शांततामय व लोकशाही मार्गाने करण्यात येणार असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची काळजी घेतली जाईल, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
या प्रकरणातील आरोपांची निष्पक्ष चौकशी होऊन सत्य समोर येणार का आणि पोलीस प्रशासन यावर काय भूमिका घेणार, याकडे आता वागदरी ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.