श्री तुळजाभवानीच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला!
नळदुर्ग बायपासवर कंटेनरची धडक; एक ठार, सहा गंभीर जखमी
नळदुर्ग, दि. २३ ऑक्टोंबर:
मुंबई–हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील नळदुर्ग बायपासवर रायता हॉटेलजवळ शुक्रवारी (दि. २३) सकाळी नऊच्या सुमारास कंटेनरने पाठीमागून धडक दिल्याने तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी पायी निघालेल्या एका भाविकाचा जागीच मृत्यू झाला, तर सहा भाविक गंभीर जखमी झाले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.
कर्नाटकातील बसवकल्याण येथून भाविकांचा समूह तुळजापूरकडे पायी जात होता. दरम्यान, हैदराबादहून मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर (एमएच ०४ एनबी ९६७१) नळदुर्ग बायपासजवळ आला असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. कंटेनर थेट पायी जाणाऱ्या भाविकांच्या अंगावर गेल्याने हा भीषण अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
अपघातात एका भाविकाचा जागीच मृत्यू झाला. सहा जखमींना डोके, हात व पायांना गंभीर दुखापती झाल्या. घटनेची माहिती मिळताच नळदुर्ग येथील जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज संस्थानची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. तसेच १०८ रुग्णवाहिका व पोलिसांच्या मदतीने जखमींना नळदुर्ग उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
गुरुसिद्ध बाबुराव कुंभार वय ३० वर्षे ,रा बसवकल्याण असे मयताचे नाव आहे.तर
अनुषा बी. रमेश (वय ३५, हैदराबाद), वीरेश हनुमंत कुंभार, वीरेश रुद्रमणी चौधरी (वय २७), संगमेश्वर बसवराज बेलुरे (वय ३३), रोहन दशरथराव हंचाटे, महादेव रामलिंगाप्पा मठपती आणि मडीवळप्पा चंद्रकांत जमादार (वय २६), सर्व राहणार बसवकल्याण कर्नाटक राज्य अशी जखमींची नावे रुग्णालयाच्या सुत्रांनी दिले आहे.
बहुतांश भाविक बसवकल्याण, जि. बिदर (कर्नाटक) येथील असल्याचे सांगण्यात आले.
तुळजाभवानीच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या अपघातामुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे. महामार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांनी पायी दिंडी व भाविकांच्या समूहाजवळून जाताना विशेष खबरदारी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.