श्री क्षेत्र तुळजापूरच्या वाटेवर भाविकांना आरोग्याचा आधार; माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे मोफत तपासणी, प्रथमोपचार व औषधवाटप
मुरूम, दि. २३ ऑक्टोंबर:
तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या हजारो भाविकांच्या सेवेसाठी मुरूम येथील माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसीने पुढाकार घेतला.
महाविद्यालयाच्या वतीने २२ व २३ ऑक्टोबर रोजी मुरूम-सोलापूर मार्गावर मोफत आरोग्य तपासणी, प्रथमोपचार आणि औषधवाटप शिबिर घेण्यात आले. प्रवासाच्या दगदगीत थकलेल्या भाविकांना या उपक्रमामुळे मोठा दिलासा मिळाला.
शिबिरात भाविकांची रक्तदाब व रक्तातील साखरेची मोफत तपासणी करण्यात आली. पायदुखी, अंगदुखी, थकवा यांसह किरकोळ आरोग्यविषयक तक्रारींवर तातडीने प्रथमोपचार करण्यात आले. तसेच आवश्यक औषधांचे मोफत वाटप करून औषधांच्या योग्य वापराबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिबिरात उत्स्फूर्त सहभाग घेत भाविकांना आरोग्यसेवा पुरविली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष समाजोपयोगी सेवेचा अनुभव मिळाला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश्वर होगाडे यांनी औषधांचा योग्य वापर आणि सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले.
शिबिराचे समन्वयन प्रा. वैष्णवी पाटील यांनी केले. प्रा. सना जमादार, प्रा. सरस्वती शेवाळकर, प्रा. योगेश पाटील, प्रा. सुदीप ढगे, प्रा. प्रियांका काजळे, प्रा. हर्षद बदोले, प्रा. शितल स्वामी, नितीन कंटेकुरे, बालाजी शेळके आणि किशोर कारभारी यांनी उपक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.