नळदुर्गमध्ये जनता फ्रुट वखारीला आग; सुदैवाने जीवितहानी टळली!
फटाक्यांच्या ठिणगीने लाकडी पेट्यांनी घेतला पेट; स्थानिक व्यावसायिकांच्या प्रसंगावधानामुळे आग आटोक्यात
नळदुर्ग, दि. १० :
येडशी आणि तुळजापूर येथे सोमवारी घडलेल्या भीषण अग्नितांडवाच्या घटना ताज्या असतानाच मंगळवारी सकाळी नळदुर्ग शहरातील अक्कलकोट रोडलगत असलेल्या जनता फ्रुट वखारीला आग लागल्याची घटना घडली. दिवाळी पाडव्याच्या दिवशी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली. स्थानिक व्यावसायिक आणि नागरिकांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी वित्तहानीही टळली.
याबाबत जनता फ्रुटचे मालक निजाम गणी बागवान यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने फटाके उडविले जात असताना त्यातील ठिणगी वखारीच्या छतावर ठेवलेल्या रिकाम्या लाकडी फळपेट्यांवर पडली. वाळलेल्या लाकडी पेट्यांनी तत्काळ पेट घेतल्याने आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. परिसरात धुराचे मोठमोठे लोट पसरल्याने नागरिकांची घटनास्थळी मोठी गर्दी जमली.
आगीची तीव्रता लक्षात घेऊन निवृत्त पोलीस कर्मचारी विजयकुमार राठोड यांनी प्रसंगावधान राखत तातडीने बोअरवेल सुरू करून आग विझविण्यासाठी मदत केली. त्यांच्यासह शेजारील व्यावसायिक फुलचंद जाधव, बाबा कटके, अहमद बागवान, अबुबखर बागवान, रोहित निंबाळकर, सागर बनसोडे, किरण नाईक तसेच वखारीतील कामगारांनी पाण्याचा मारा करीत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अखेर त्यांच्या सामूहिक प्रयत्नांना यश आले. दरम्यान, अग्निशमन वाहन घटनास्थळी पोहोचले.
दरम्यान, अग्निशमन वाहन घटनास्थळी पोहोचले.
या आगीत महावितरणच्या खांबावरून वखारीकडे आलेली विद्युत केबल जळून खाक झाली. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील वीजपुरवठा तब्बल दोन तास बंद ठेवण्यात आला होता.