दुष्काळाच्या झळांनी सोयाबीनवर फिरविला नांगर; ४० हजारांचा खर्च मातीमोल!
उत्पादनाची आशा मावळली; किमान शेतात खत तरी होईल, या अपेक्षेने अणदूरच्या शेतकऱ्याचा टोकाचा निर्णय
शिवाजी नाईक
नळदुर्ग, दि. १० नोव्हेंबर :
निसर्गाच्या लहरीपणाचा आणि पावसाच्या दडीचा फटका शेतकऱ्यांना किती भीषणरीत्या बसतो, याचे विदारक चित्र तुळजापूर तालुक्यातील अणदूर शिवारात पाहायला मिळाले. यंदाच्या खरीप हंगामात पावसाअभावी सोयाबीनचे पीक हातचे गेल्याने, उरल्यासुरल्या पिकातूनही काहीच पदरात पडणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शेतकऱ्याने उभ्या पिकावरच नांगर फिरविला. तीन एकरांतील सोयाबीनसाठी केलेला जवळपास ४० हजार रुपयांचा खर्च अक्षरशः मातीमोल ठरला आहे.
अणदूर येथील शेतकरी कल्याण करपे यांनी यंदा खरीप हंगामात तीन एकर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली होती. त्यासाठी सोयाबीन बियाण्याच्या तीन पिशव्या वापरण्यात आल्या. चांगले उत्पादन मिळेल, या अपेक्षेने त्यांनी पेरणीपासून पिकाच्या संगोपनापर्यंत कोणतीही कसर सोडली नाही. मात्र, पावसाने ओढ दिल्याने सोयाबीनचे पीक अपेक्षित वाढू शकले नाही. पिकाला शेंगा भरल्या नाहीत, तर काही ठिकाणी सोयाबीनची झाडे वाळून गेली. अखेर हातातोंडाशी आलेला घासही निसर्गाने हिरावून घेतला.
विशेष म्हणजे, पीक काढणीसाठी मजुरांनी आठ हजार रुपयांची मागणी केली. त्यात मळणी यंत्राचा खर्चही वेगळाच. परंतु, काढणी करूनही पाच हजार रुपयांचे सोयाबीन हाती येण्याची शक्यता नसल्याने करपे यांनी पीक काढण्याऐवजी शेतातच नांगर फिरविण्याचा निर्णय घेतला. परिपक्व न झालेल्या सोयाबीनला बाजारात व्यापारीही योग्य भाव देणार नाहीत. त्यामुळे काढणीचा खर्चही निघणार नाही. निदान पिकाची नांगरट केल्याने त्याचे जमिनीत खत तरी होईल, या आशेने त्यांनी हे पाऊल उचलले.
तीन एकरांसाठी ४० हजारांचा खर्च
करपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन एकर सोयाबीनसाठी झालेला खर्च पुढीलप्रमाणे आहे. नांगरणीसाठी ६ हजार ६०० रुपये, रोटर मारण्यासाठी ३ हजार ६०० रुपये, पेरणीसाठी ३ हजार ९०० रुपये, खतासाठी ४ हजार २०० रुपये, तीन वेळा कोळपणीसाठी ९ हजार रुपये, तर चार वेळा फवारणीसाठी १२ हजार ६०० रुपये असा एकूण जवळपास ४० हजार रुपयांचा खर्च झाला आहे.
कष्ट पेरले, पैसा खर्च केला; पण पदरात मात्र निराशाच!
शेतात राबूनही उत्पादन मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटत आहे. एका बाजूला मशागतीपासून फवारणीपर्यंत वाढता खर्च आणि दुसऱ्या बाजूला पावसाची अनिश्चितता, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. अणदूर शिवारातील या घटनेने दुष्काळी परिस्थितीचे आणि बळीराजाच्या हतबलतेचे वास्तव पुन्हा एकदा समोर आणले आहे.