बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट; नळदुर्ग पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल!
परवाना नसताना वैद्यकीय व्यवसाय; औषधे व इंजेक्शनचा साठा
नळदुर्ग, दि. ९ : तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे कोणताही वैद्यकीय परवाना नसताना डॉक्टर असल्याचे भासवून रुग्णांवर उपचार करणाऱ्या पश्चिम बंगालमधील दोघांविरुद्ध नळदुर्ग पोलिस ठाण्यात फसवणूक व नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे ग्रामीण भागातील अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय उघडकीस आला आहे.
दीपंकर मोटो मंडल आणि सुशांत बिरेन मंडल (दोघे रा. जलकर, भोमस पश्चिमपारा, जि. नादिया, पश्चिम बंगाल; सध्या रा. चिवरी, ता. तुळजापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास चिवरी येथील हनुमान मंदिराजवळ असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये हे दोघे विनापरवाना वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे आढळून आले. त्यांच्याकडे बीपी तपासणी यंत्र, डिजिटल थर्मामीटर, स्टेथोस्कोप, टॅब्लेट, कॅप्सूल, इंजेक्शन, जेल, आयव्ही सेट, कापूस आणि लोशन यांसारखे वैद्यकीय साहित्य व औषधांचा साठा होता. कोणतीही अधिकृत वैद्यकीय पात्रता अथवा परवाना नसताना अधिकृत डॉक्टर असल्याचे भासवून नागरिकांना औषधे व गोळ्या देत असल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी प्राथमिक आरोग्य केंद्र काटगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. साईनाथ संगमेश्वर जळकोट (वय ३४) यांनी ८ नोव्हेंबर रोजी नळदुर्ग पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरून दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१९, १२५ तसेच वैद्यकीय व्यवसायी अधिनियमातील कलम ३३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा प्रश्न गंभीर
वैद्यकीय उपचारांच्या नावाखाली अपात्र व्यक्तींकडून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्यास अशा प्रकारांना वेळीच आळा घालणे आवश्यक आहे. विशेषतः ग्रामीण भागात अशा अनधिकृत वैद्यकीय व्यवसायाची तपासणी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.