मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात बारूळची जिल्ह्यात बाजी!
५० लाखांचे घसघशीत पारितोषिक; एकोंडी द्वितीय, तर जवळगा (मेसाई) ग्रामपंचायतीचा तृतीय क्रमांक

धाराशिव, दि. ७ नोव्हेंबर : गावाच्या विकासाला लोकसहभागाची जोड आणि प्रशासनाला कार्यक्षमतेची दिशा मिळाल्यास ग्रामविकासाचा आदर्श कसा घडू शकतो, याचा प्रत्यय मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या जिल्हास्तरीय निकालातून आला आहे. 

या अभियानात तुळजापूर तालुक्यातील बारूळ ग्रामपंचायतीने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावत तब्बल ५० लाख रुपयांच्या पारितोषिकावर आपले नाव कोरले आहे. लोहारा तालुक्यातील एकोंडी (लो.) ग्रामपंचायतीने द्वितीय, तर तुळजापूर तालुक्यातील जवळगा (मेसाई) ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक मिळवत जिल्ह्यातील मानाच्या पुरस्कारांवर मोहोर उमटवली आहे.

ग्रामपंचायतींचे सक्षमीकरण, गावांचा सर्वांगीण विकास, पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासन तसेच लोकसहभागातून विकासकामांना गती देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत ग्रामपंचायतींच्या विविध विकासकामांचा आणि प्रशासकीय कामगिरीचा आढावा घेऊन जिल्हास्तरावर पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली. त्यात धाराशिव जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींनी उल्लेखनीय यश संपादन केले.
बारूळ ग्रामपंचायतीने विकासकामांतील सातत्य, नियोजन आणि सामूहिक प्रयत्नांच्या बळावर जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले. एकोंडी आणि जवळगा (मेसाई) ग्रामपंचायतींनीही आपल्या कामगिरीच्या जोरावर अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. त्यामुळे तुळजापूर तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

या यशामागे ग्रामपंचायतींचा पुढाकार, लोकप्रतिनिधींची विकासाभिमुख इच्छाशक्ती आणि ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नमूद केले. त्यांनी बारूळ, एकोंडी आणि जवळगा (मेसाई) येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, कर्मचारी आणि ग्रामस्थांचे अभिनंदन केले.

गावाच्या विकासासाठी लोकसहभागाची एकजूट आणि प्रशासनाची कार्यतत्परता एकत्र आली, तर यशाचे शिखर गाठता येते, हे या तिन्ही ग्रामपंचायतींनी आपल्या कामगिरीतून दाखवून दिले आहे. लोकसहभागातून ग्रामविकासाची ही यशस्वी वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहावी, अशा शुभेच्छा आमदार पाटील यांनी दिल्या.

Recent News

 
Top