नळदुर्ग अपघातातील दुसऱ्या  जखमीचाही  मृत्यू; मृतांची संख्या दोनवर,रुग्णालयात उपचार सुरू असताना शिवाजी चौधरी यांची प्राणज्योत मालवली

नळदुर्ग, दि. ९ नोव्हेंबर : 

तुळजापूर–नळदुर्ग महामार्गावरील जगतापनगरजवळ १४ ऑक्टोबर रोजी झालेल्या दुचाकी आणि कारच्या भीषण अपघातातील दुसऱ्या गंभीर जखमीचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. शिवाजी मारुती चौधरी (वय ६५) यांची सोमवारी (दि. ९) पहाटे एकच्या सुमारास प्राणज्योत मालवली. या अपघातातील मृतांची संख्या आता दोनवर पोहोचली आहे.

तुळजापूरहून नळदुर्गच्या दिशेने येणारी स्विफ्ट कार (क्र. टीजी ०८ एपी ०७१८) आणि नळदुर्गहून जगतापनगरकडे जाणारी मोटारसायकल (क्र. एमएच १४ ईडी ०१९५) यांची १४ ऑक्टोबर रोजी सकाळी वसंतनगरजवळ जगतापनगर येथे समोरासमोर जोरदार धडक झाली होती. या भीषण अपघातात अनिल सोपान काळे, शिवाजी मारुती चौधरी आणि ज्योतिबा (खंडू) अंबादास जगताप (वय ३७) हे तिघे गंभीर जखमी झाले होते. डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या अनिल काळे यांचा अपघाताच्या दिवशीच उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

अपघातातील जखमींना जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नळदुर्ग पॉइंटवरील रुग्णवाहिकेचे चालक सुनील भोळे यांनी तत्काळ नळदुर्ग उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. प्राथमिक उपचारानंतर तिघांनाही पुढील उपचारांसाठी सोलापूर येथे हलविण्यात आले होते.

शिवाजी चौधरी यांच्यावर सोलापूर येथील यशोधरा रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृती चिंताजनक झाल्याने ते कोमात गेले होते. त्यांना शनिवारी नळदुर्ग उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, सोमवारी पहाटे एकच्या सुमारास त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनाची माहिती त्यांचे पुतणे भाजपचे सुनील चौधरी यांनी दिली.

शिवाजी चौधरी हे महावितरणमधील सेवानिवृत्त कर्मचारी होते. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. अपघातानंतर तब्बल २६ दिवसांनी दुसऱ्या जखमीचाही मृत्यू झाल्याने नळदुर्ग परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Recent News

 
Top